महाराष्ट्रात २८ लाख शेतकऱ्यांना १२१३ कोटींचे पीक विम्याचे वाटप झालेले आहेत. राज्यातील पीक विमा वाटपाची नुकसान भरपाई २१५७ कोटी इतकी निश्चीत करण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापही २२ लाख शेतकरी जवळपास ९४४ कोटींच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे. दहा नोव्हेंबरला कृषी राज्यमंत्री यांनी औरंगाबादमध्ये बैठक घेत ४ दिवसांत पैसे देण्याचे आदेश पीक विमा कंपन्यांना दिले होते. त्यानंतर मुंबईतही मंत्रिमंडळाच्या पूर्वी बैठक घेतली. मात्र अजूनही कंपन्यांकडून संपूर्ण विम्याच्या रक्कमचे वितरण झाले नाही. कंपन्यांकडून संथ गतीने काम होत आहे.
राज्यात ५१ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या बाबत तक्रारी केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन, मका यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे विरोधी पक्षाकडूनदेखील पीक विम्याच्या बाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील पीक विम्याच्या बाबत शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसल्या बाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
९४४ कोटींच्या पीक विम्याची प्रतीक्षा : राज्यात ५१ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या बाबत तक्रारी केल्या आहेत. यामध्ये सध्या २८ लाख ९६ हजार २६७ शेतकऱ्यांना १२१३ कोटी रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहे. यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसानाच्या सूचनाबाबत मीड टर्मची नुकसान भरपाई १३ लाख ८० हजार ३७२ शेतकऱ्यांना ५०९ कोटी रुपयांची रक्कमचे वाटप केले. तर १५ लाख १५ हजार ८९५ शेतकऱ्यांना ७०४ कोटीचे वाटप करण्यात आले. यामध्ये एकूण नुकसानीची स्थिती पाहता ९४४ कोटी रुपयांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
शेतकऱ्यांना मिळतोय तीन ते चार हजारांचा विमा ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा काढला त्यांना केवळ तीन हजार रुपये इतकीच रक्कम मिळत आहे. त्यामुळे जेवढी रक्कम विम्यासाठी भरली तेवढीच मिळत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्याकडून केल्या जात आहे. हा मीडटर्मचा विमा असून त्यानंतर अजून रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर कापसाचा विमादेखील अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे परभणी औरंगाबादसह मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत कापसाच्या विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.