• Mon. Apr 28th, 2025

“अजित पवार चार महिन्यांत तुरुंगात जाणार”, शालिनीताई पाटलांचा दावा, एकनाथ शिंदेंबाबतही केलं मोठं वक्तव्य

Byjantaadmin

Dec 26, 2023

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून वेगळी चूल मांडल्यापासून माजी खासदार शालिनीताई पाटील या अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी पुन्हा पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील”, असा दावा पाटील यांनी केला आहे. तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं पाटील म्हणाल्या.अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाबरोबर गेल्याची चर्चा सातत्याने होत आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर शालिनीताई म्हणाल्या, तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही. पुढच्या चार महिन्यांत अजित पवार तरुंगात जातील. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. अजित पवार तुरुंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायलाही कोणी जाणार नाही. शालिनीताई पाटील मुंबई तकशी बोलत होत्या.

Ajit Pawar shalini patil

 

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतील असं बोललं जात आहे. याबाबत शालिनीताई म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदेदेखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतील. कारण, एकनाथ शिंदे पक्ष फोडून बाहेर पडले आहेत. ते शिवसेनेच्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडून आले आहेत. ते केवळ सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. परंतु, त्यांना सरकार चालवता येत नाही.शालिनीताई पाटील म्हणाल्या, राज्यात याचं बंड, त्याचं बंड, ग्रामसेवकांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान, मराठवाड्यातला दुष्काळ, त्यामुळे निर्माण झालेले शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा आणि ऊसाचा प्रश्न, अशा कुठल्याही प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंना तोडगा काढता आला नाही. यंदा महाराष्ट्रात कांद्याचं राज्याच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन झालं आहे. त्यामुळे तो कांदा निर्यात करायला हवा. परंतु, केंद्राने कांद्यावर निर्यातबंदी लागू केली आहे. ही निर्यातबंदी उठवण्याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी १० वेळा शब्द दिला. ते दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री AMIT SHAH यांना भेटायला गेले. पण शाहांनी त्यांची भेट घेतली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed