• Tue. Apr 29th, 2025

राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हा अभ्यासक्रम, शाळा बंद बाबत शिक्षणमंत्री म्हणतात…

Byjantaadmin

Dec 25, 2023

राज्यात शालेय अभ्यासक्रमात व्यापक बदल केले जात आहे. एकीकडे पटसंख्या नसलेल्या शाळांचे एकीकरणाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे अभ्यासक्रम काळानुसार केला जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी विषय आहे. यामुळे शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान लहानपणापासून दिले जाणार आहे. मुलांना शेतीचे ज्ञान झाल्यास ते व्यावहारिक शेती करु शकतात. यामुळे राज्यात पहिलीपासून कृषी विषय अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार आहे. कृषी विषयासाठी नवीन मसुदा तयार झाला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय असणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

शिक्षक बेरोजगार होणार नाही

डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी दीपक केसरकर दापोलीत आले होते. यावेळी त्यांनी ‘टीव्ही९ मराठी’शी बोलताना शालेय अभ्यासक्रमातील बदल आणि इतर बाबींवर चर्चा केली. दीपक केसरकर म्हणाले, मुलांना मातृभाषेतून म्हणजेच मराठीमधून चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. शालेय शिक्षणात शेती अभ्यास शिकवण्यात येणार आहे. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरणाचा विचार असला तरी शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. महाराष्ट्रातला एकही शिक्षक बेरोजगार होणार नाही. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान मुख्यमंत्र्यांनी सुरु केले असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

जगाला मॅन पॉवर पुरवण्याची राज्यात क्षमता

जगाला मॅन पॉवर पुरवण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे. जगात स्किल डेव्हलपमेंटसाठी मुले पाहिजेत. आपण आपल्या अभ्यासक्रमात कौशल्य विकासावरच भर देत आहोत. मुलांना ज्ञान आणि रोजगार मिळावा, हा उद्देश ठेऊन अभ्यासक्रम करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी वरळीत स्वच्छता मोहीम राबवली. त्यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, संपूर्ण मुंबईत आम्ही स्वच्छता करणार आहोत. आम्ही वरळी बिराळी काही बघत नाही. आता कानाकोपऱ्यामध्ये स्वच्छता व्हायला लागली आहे. मुंबई बदलायला लागली आहे. आदित्य ठाकरे यांनी मंत्री म्हणून काय काम केले ? उगाच म्हणायचं मी इथून लढत होते तिथून लढवत आहे, असे सांगत ठाणे लोकसभेतून आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असल्याच्या चर्चांना उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed