आझाद मैदान, शिवाजीपार्क असे बरीच मैदाने आम्हाला लागणार आहेत. मैदानांसाठी आमच्या सगळ्या टीम कामाला लागल्या आहेत. घोषणा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळपासून मुंबईत सभा होतील. सरकार त्यांचे काम करतंय आम्हीही कामच करतोय, असे म्हणत मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा दिला आहे. मुंबईत उपोषण करण्यावर ठाम असल्याचे जरांगे यांनी यातून स्पष्ट केले.मराठा आंदोलन 6 टप्पाबाबत अजून निश्चित झालेले नाही. त्या वेळापत्रकावर चर्चा सुरू आहे. सध्या मुंबईतील मैदाने बघितली आहेत. कोणत्या मार्गाने जायचे आहे, याचे काम सुरू आहे. आमच्या टीम गेलेल्या आहेत. फक्त आता समस्या दौऱ्याची आहे. आज प्रत्यक्ष बसून यावर निर्णय घेण्यात येईल आणि त्याची माहिती देण्यात येईल, असे जरांगे-पाटील म्हणाले. मुंबईत धडकणारच. कारण मराठा समाज थांबायला तयार नाही. समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी दौऱ्यावर जाणार आहे. 20 च्या आत मुंबईत सभा घेणार आहे. त्यानंतर काही विषयच येत नाही. 20 नंतर आंदोलनाचा शेवटचा टप्पा असेल. ते मोठे आंदोलन होणार आहे, असे जरांगे म्हणाले.
अजित पवारांना टोला
महिलेचे नाव मुलाच्या पुढे लावले जाईल. आधी मुलाचे, मग आईचे, वडिलांचे आणि मग आडनाव नाव लावले जाईल, असेही काहींनी म्हटले. मग आईची जात लावा म्हटल्यावर काय दुखते? मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आईची जात लावली पाहिजे, हे त्यांना का दिसत नाही? तिथे त्यांचे तोंड उघडत नाही, असे म्हणत जरांगे-पाटील यांनी टोला लगावला आहे. आवाहन करूनही काही लोक मुंबईला जायला निघाले आहेत, असे AJIT PAWAR म्हणाले होते. त्यावर जरांगे-पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.
‘मराठ्यांविरोधात मोहीम सुरू’
सगळ्या पक्षातल्या आमदारांनी, मंत्र्यांनी आणि खासदारांनी मराठा तरुणांच्या पाठिशी ताकदीने उभे राहावे. तेही प्रत्यक्षपणे. हीच वेळ आहे. नाहीतर मराठा तुम्हाला दारात उभे करणार नाहीत, असे आवाहन जरांगे यांनी केला. आमच्या विरोधात कोण-कोण मोहीम राबवतेय, मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून कोणाची मोहीम सुरू आहे? हे मराठ्यांना माहीत आहे. हे 20 तारखेनंतर कळेल, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले.