आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. इलेक्शन मोडमध्ये नेहमीच असणाऱ्या सत्ताधारी भाजपने केव्हाच आगामी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. विरोधी इंडिया आघाडीकडून सुद्धा पीएम मोदींची केंद्रातील हॅट्ट्रिक रोखण्यासाठी रणनीती आखली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज नेटवर्कसाठी सी व्होटरकडून 2024 मधील पहिला ओपिनियन पोल सादर करण्यात आला. या पोलच्या माध्यमातून लोकसभेसाठी निर्णायक असणाऱ्या उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि पंजाब राज्यातील जनमताचा कौल घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार असा भक्कम प्रचार केला जात असतानाही महायुती सरकारची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आलं आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी अजूनही विस्कळीत दिसत असतानाही एक प्रकारे बुस्टर डोस मिळेल, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
सी व्होटर ओपनियन पोल कोणत्या पद्धतीने करण्यात आला?
एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने 2024 चा पहिला ओपिनियन पोल घेतला. रविवारी (24 डिसेंबर) ओपिनियन पोल पार्ट 2 मध्ये देशातील 5 मोठ्या राज्यांचे सर्वेक्षण सादर करण्यात आले. वर्षभरापासून सुरू असलेल्या सी व्होटरच्या या ट्रॅकरमध्ये 2 लाखांहून अधिक लोकांच्या मतांचा समावेश आहे. यामध्ये त्रुटीचे मार्जिन अधिक उणे (मायनस) 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.
आता लोकसभा निवडणूक काय होईल?
सी व्होटरने लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या असत्या, तर कोणाचा विजय किंवा पराभव झाला असता? या धर्तीवर जनमत चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे लोकसभेच्या तोंडावर देशातील निर्णायक ठरणाऱ्या पाच मोठ्या राज्यांमधील जनमत चाचण्यांचे आकडे धक्कादायक आहेत. यामध्ये पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 223 जागा आहेत. या जागांवरच्या विजयामुळे देशात कोणाची सत्ता येणार याचा अंदाज येतो.
महाराष्ट्रात महायुतीला इशारा!
महाराष्ट्रात करण्यात आलेल्या चाचणीत शिंदे फडणवीस प्रणित महायुती सरकारला तगडा हादरा बसण्याचा अंदाज सी व्होटरच्या जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात महाविकास सरकार स्थापन, त्यानंतर आलेली कोरोना लाट अन् Eknath Shinde च्या बंडाळीने कोसळलेलं महाविकास आघाडी सरकार आणि त्यानंतर वर्षभरानंतर पुन्हा अजित पवारांनी शिंदेंचा मार्ग वापरून फोडलेली राष्ट्रवादी यामुळे राज्याच्या राजकारणात सपशेल चिखल झाला आहे. त्यामुळे राजकीय स्थिती अस्थिरतेच्या खाईत आहे. यानंतर आरक्षणासाठी सर्वच जाती रस्त्यावर असल्याने सुद्धा मोठी भर पडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महायुती सरकारला जनमत चाचणीत फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा ओपिनियन पोल – कोणाला किती जागा?
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा असून जनमत चाचणीत महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. आज जर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली असती तर पोलनुसार भाजप महायुतीला+ 19-21 जागा मिळाल्या असत्या, तर महाविकास आघाडीला + 26-28 जागा मिळाल्या असत्या. इतरांना 0-2 जागा मिळाल्या असत्या. मतांच्या टक्केवारीनुसार, भाजपला + 37 टक्के, काँग्रेसला+ 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मते मिळतील.
कोणाला किती जागा?
स्रोत- सी व्होटर
लोकसभेच्या जागा – 48
भाजप+ 19-21
काँग्रेस + 26-28
इतर- 0-2
महाराष्ट्रात कोणाला किती मते?
स्रोत- सी व्होटर
लोकसभेच्या जागाा- 48
भाजप+ 37%
काँग्रेस + 41%
इतर – 22%
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट मुकाबला
राज्यात लोकसभेला सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच मुकाबला होणार आहे. राज्यात मराठा आरक्षण कळीचा मुद्दा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका सुद्धा संतापात भर टाकत आहेत. त्यामुळे महायुती सरकारला पुढील दिवस टी-20 पद्धतीचे असतील, अशीच शक्यता आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडील रुसवे फुगवे दूर करून जागावाटप संयमाने केल्यास निश्चित महायुतीला तगडे आव्हान निर्माण होईल, अशी स्थिती आहे. 22 जानेवारीनंतर लोकसभेचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्यामुळे हाच कल कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला सुद्धा ताकद लावावी लागणार आहे.
मोदींच्या कामावर किती लोक समाधानी?
दुसरीकडे, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच जोरदार प्रचार सुरू केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणनीतीवर बरीच चर्चा झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पक्षाच्या नेत्यांना विजयाचा मूल मंत्र दिला. देशातील जनता केंद्र सरकारच्या कारभारावर किती समाधानी आहे, यासंदर्भात निवडणुकीपूर्वी जनमत चाचणीचा कल समोर आला आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी जास्तीत जास्त 38 टक्के लोकांनी ‘खूप समाधानी’ असल्याचे सांगितले. त्याच वेळी, केवळ 26 टक्के लोकांनी ‘असंतुष्ट’ असल्याचे सांगितले. याशिवाय ज्यांनी ‘कमी समाधानी’ उत्तरे दिली त्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांचा आकडा 33 टक्के नोंदवला गेला.
राहुल गांधींच्या कामिगिरीवर किती समाधानी?
ओपिनियन पोलच्या माध्यमातून राहुल गांधींच्या कामावर जनता किती समाधानी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या लोकांपैकी सर्वाधिक 39 टक्के लोकांनी ‘असंतुष्ट’ असल्याचे सांगितले. त्याच वेळी, केवळ 26 टक्के लोकांनी ‘खूप समाधानी’ म्हटले आहे. याशिवाय ‘कमी समाधानी’ असलेल्या लोकांची संख्या 21 टक्के आहे. 14 टक्के लोकांना याबाबत काहीही माहिती नाही.
सूचना :- 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास सुमारे अडीच महिने उरले आहेत. अशा परिस्थितीत 2024 च्या निवडणुका लक्षात घेऊन सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी पहिला ओपिनियन पोल घेतला आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या सी व्होटरच्या या ट्रॅकरमध्ये 2 लाखांहून अधिक लोकांच्या मतांचा समावेश आहे. यामध्ये त्रुटीचे मार्जिन अधिक उणे (मायनस 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.