राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदी संजय शेटे यांची नियुक्ती
लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबईतील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, प्रदेश कार्यालयीन सरचिटणीस रवींद्र पवार व राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते संजय महादेव शेटे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली.
संजय शेटे यांचे शिक्षण बी.एस.सी. पर्यंत झाले असून त्यांना अगदी विद्यार्थी दशेपासूनच राजकीय क्षेत्राचे आकर्षण राहिले आहे. म्हणूनच की काय त्यांनी वर्ष १९९२ – ९३ मध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे. वर्ष १९९३ ते १९९४ या कालावधीत मुरुडच्या काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. वर्ष १९९४ ते १९९५ याकाळात ते युवक काँग्रेस आय चे मुरुड जिल्हा परिषद मतदार संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. वर्ष १९९५ ते १९९९ या काळात त्यांनी लातूर तालुका युवक काँग्रेस आयचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेनंतर वर्ष १९९९ ते २०११ अशी सलग बारा वर्षे त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या लातूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच वर्ष २०११ ते २०१८ अशी सात वर्षे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. तर वर्ष २०१८ ते आजपावेतो ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
उत्कृष्ट संघटन कौशल्य, सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या त्यांच्या लकबीमुळे येणाऱ्या काळात खा.शरद पवार यांचे विचार तेवढ्याच सक्षमपणे सामान्य जनतेपर्यंत पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात वाढविण्याच्या उद्देशाने पार्टीने त्यांच्यावर लातूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. ते ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील सर्वच प्रमुख नेत्यांना आहे.
आपल्यावर सोपविण्यात आलेल्या या नूतन जबाबदारीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय शेटे म्हणाले की, पार्टीने अत्यंत विश्वासाने आपल्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी आपण तेवढ्याच सक्षमपणे पेलून जिल्ह्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांचे विचार तळागाळातील जनता – कार्यकर्त्यांपर्यंत पोचवून पार्टीला जिल्ह्यात क्रमांक एकवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले.