• Tue. Apr 29th, 2025

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा – केंद्रीय सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा

Byjantaadmin

Dec 24, 2023

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा केंद्रीय सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा

लातूर, (जिमाका): विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश गावखेड्यातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनाचा लाभ पोहोचविणे आहे. तसेच ज्यांना अद्याप या योजनांचा लाभ मिळालेला नाही, त्या पात्र लाभार्थांची नोंदणी या यात्रेअंतर्गत करण्यात येत असल्याचे केंद्रीय कापड उद्योग मंत्रालयाच्या सह सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्रीमती लवंगारे-वर्मा बोलत होत्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे, नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त रामदास कोकरे, विकसित भारत संकल्प यात्रेचे नोडल अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत उपक्रमात जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांची नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत झालेली विविध योजनांसाठीची नोंदणी, यात्रेत सहभागी नागरिक, आरोग्य शिबीर व इतर उपक्रमातील सहभाग याची माहिती त्यांनी घेतली. तसेच लातूर जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.लातूर जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेचे 1 लाख 36 हजार एवढे पूर्वीचे लाभार्थी आहेत. लातूर जिल्हा धूरमुक्त जिल्हा झाला आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या काळात ग्रामीण भागात 2149 तर शहरी भागातून 3765 एवढ्या लोकांच्या नोंदी झाल्या आहेत. त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून त्यातील पात्र लाभार्थ्यांना उज्वला योजनेचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यात केरोसीनची डिमांड शून्यावर आली आहे. घरकुल आवास योजना, शिष्यवृत्ती, आयुष्यमान कार्ड, उज्वला गॅस योजनेसह इतर वैयक्तिक लाभाच्या योजनाही गावोगावी पोहचविल्या जात असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत ग्रामीण भागात आयोजित उपक्रमांचा मंडळ आणि गावनिहाय रोजच्या रोज आढावा घेतला जात आहे. लातूर जिल्हा राज्यात उद्दिष्टपूर्तीत पहिल्या दहामध्ये असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed