• Tue. Apr 29th, 2025

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पथक नेमून  शासकीय आरोग्य संस्थांमधील साहित्याची तपासणी करावी- ना. संजय बनसोडे

Byjantaadmin

Dec 24, 2023

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पथक नेमून  शासकीय आरोग्य संस्थांमधील साहित्याची तपासणी करावीना. संजय बनसोडे

  • कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा आढावा
  • व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध साठा पुरेशा प्रमाणात ठेवण्याच्या सूचना

लातूर, (जिमाका): काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात सध्या या व्हेरियंटचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणेने सज्ज राहणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडरसह इतर उपलब्ध साधनसामग्रीची जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्याच्या सूचना क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी आज येथे दिल्या.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट जेएन-वनचा प्रसार देशातील काही राज्यांमध्ये होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ना. बनसोडे बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. उदय मोहिते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांची यावेळी उपस्थिती होती.

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण जिल्ह्यात आढळल्यास त्यावर उपचारासाठी आवश्यक साधनसामग्री, औषधी याचा पुरेसा साठा तालुकास्तरीय आरोग्य संस्थेतही उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी. तसेच ऑक्सिजन सिलेंडरसह ऑक्सिजन प्लांटची सद्यस्थिती तपासून आवश्यक कार्यवाही तातडीने करावी. नागरिकांना या व्हेरियंटच्या अनुषंगाने अधिकृत माहिती देवून त्यांनी काय काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करावी, अशा सूचना ना. बनसोडे यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यात सुरु असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर आरोग्य संस्थांच्या इमारतींची कामे तातडीने पूर्ण करून त्या कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या अनुषंगाने प्राप्त सूचनांनुसार जिल्हास्तरावर आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी दिली.

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावरून आलेल्या सूचनांनुसार कार्यवाही सुरु असून याबाबत जिल्हास्तरावरही सातत्याने आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यात सध्या या व्हेरियंटचा रुग्ण आढळून आलेला नसला तरी लक्षणे असलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासाठी कीट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात उपलब्ध आरोग्य साधनसामग्रीची माहिती त्यांनी यावेळी दिली.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या उपचारासाठी 50 खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा तपासणीसाठी ‘मॉक ड्रील’ घेण्यात आल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed