पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे. शिक्षणाचे माहेरघर आहे. शहरात स्पर्धा परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी येतात. काहींना यश मिळते. काहींना मिळत नाही. मग नैराश्यात येणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांना गंडवण्याचे प्रकार अनेक जण करत असतात. पुणे शहरातील पाषणमधील उच्चभ्रू भागातये वृषाली ढोले शिरसाठ या ३८ वर्षीय महिलेने कॉर्पोरेट कार्यालय थाटले. कन्सल्टन्सी सुरु केली. आपल्या कन्सल्टन्सीची जाहिरात केली. मग भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेकांना गंडवण्याचे काम सुरु केले. त्यात गंडा बांधणे, राख खाण्यास देणे, स्वत:ची पूजा करुन घेणे, स्वत:चे पाय धुतलेले पाणी पिण्यास देणे, असे प्रकार सुरु केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवकाला दीड लाखात वृषालीने गंडवले. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिचा भांडाफोड केला.
काय आहे नेमका प्रकार
पुणे येथील पाषाणमध्ये वृषाली ढोले शिरसाठ हिने कन्सल्टन्सी सुरु केली. नैराश्यग्रस्त असलेल्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन करण्याची जाहिरात सोशल मीडियावर केली. त्या माध्यमातून अनेकांकडून लाखो रुपये उकळले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांना वृषाली यांच्या जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी स्ट्रींग ऑपरेशन करुन तिचे भांडाफोड केले. वृषालीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. त्याला मृत्यूची भीती दाखवली. सुमारे दीड लाख रुपयांमध्ये फसवणूक त्याची फसवणूक केली.
कसे राबवले स्ट्रीग ऑपरेशन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशाल विमल यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या मार्फत हे स्ट्रीग ऑपरेशन राबवले. साध्या वेशातील पोलीस आणि विशाल वृषालीच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी बाहेर रिसेप्शनवर माया गजभिये आणि सतीश वर्मा बसले होते. त्यांनी 1 हजार रुपये कन्सलटींग भरण्याचे सांगितले. त्यानंतर ते वृषाली ढोले-शिरसाठ यांच्या कॅबिनमध्ये ते गेले. वृषाली यांनी कोणतीही समस्या न विचारता विशाल यांच्यावर भोंदूगिरीने उपचार सुरु केले. विशाल यांच्या हातात गंडा बांधला. त्यांना राख खाण्यास दिली. वृषाली सर्वांना या प्रकारे फसवत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी वृषाली यांच्यावर गुन्हा दाखल केला. घटनास्थळी जादुटोण्याच्या वस्तू जप्त केल्या.