राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात नागपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटातील सर्वच आमदारांनी दांडी मारली आहे.रेशीमबाग परिसरातील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात संघाच्यावतीने हे बौद्धिक घेण्यात येते. या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या भाजपच्या आमदारांना मध्यंतरीच्या काळात पक्षांतर्गत कारवाईला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळं यंदाच्या बौद्धिक वर्गाला भाजपचे सर्वच आमदार आवर्जुन उपस्थित होते. महायुतीमधील घटक पक्ष असलेला शिवसेना एकनाथ शिंदे गटही या कार्यक्रमात सहभागी झाला.सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या व शिंदे गटाच्या सर्व मंत्री व आमदारांनी रेशीमबागेत स्मृती मंदिर परिसरात येऊन आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व त्यांचा गट अनुपस्थित होता. स्मृती मंदिराला भेटीचे निमंत्रण भाजपच्या माध्यमातून शिंदे गटाचे आमदार व मंत्री आणि महायुतीमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटालाही देण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने संघाच्या या कार्यक्रमाला अनुपस्थिती नोंदविल्यामुळं महायुतीत असलो तरी विचारधारा अद्यापही वेगळी असल्याचा संदेश राजकीय वर्तुळाला पवारांनी दिल्याची चर्चा स्मृती मंदिर परिसरात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारी (ता. 19) सकाळपासूनच आपला मोबाइल ‘स्वीच ऑफ’ ठेवला होता. अजित पवार गटातील अनेक आमदार फोन उचलत नव्हते. प्रत्यक्ष चर्चेदरम्यान एका नेत्यानं आम्ही शाहू – फुले आंबेडकर विचाराला मानणारे आहोत. त्यानुसार आम्ही आमची भूमिका घेतो. याबाबत भाजपला कळवण्यात आले आहे, असं स्पष्ट केले.यंदाच्या बौद्धिक वर्गाला आमदारांची संख्या वाढल्याने रेशीमबाग परिसरातील हिरवळीवर बैठक व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विजयादशमी उत्सवातील भाषणाची प्रत सर्व आमदारांना यावेळी वितरित करण्यात आली. विदर्भ सरसंघचालक श्रीधर घाडगे यांच्याकडून आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं. मात्र विचारधारेच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाने संघाच्या बौद्धिकाकडं पाठ फिरवली असल्याचं सांगितलं जात आहे.अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी कार्यक्रमाला यायला हवं होतं. रेशीमबाग येथे आल्यावर लगेच काही बिघडलं नसतं, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली. शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे, भरत गोगावले यांनी आपल्यासाठी स्मृतीस्थळ नवीन नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.