संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेतील घुसखोरी प्रकरणाचा मुद्दा तापला. विरोधकांनी मंगळवारी लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळे सरकारकडून ४९ खासदारांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, काँग्रेसचे शशी थरूर यांच्यासह ४९ खासदारांना निलंबित करण्यात आले. यामुळे आता विरोधकांकडून सरकावर हल्लाबोल केला जात आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सुरक्षेच्या मुद्द्यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारची दडपशाही सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सुळे म्हणाल्या, ‘संसदेत आम्ही लोकशाही पद्धतीने मागणी करत होतो, पण या देशात दडपशाही सुरू झाली आहे. शंभरपेक्षा अधिक खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे. आम्ही सुरक्षेच्या मुद्द्यावर केवळ चर्चेची मागणी करतोय. या देशाचे गृहमंत्रीamit shah आहेत, त्यांनी याबाबत लोकसभेत भाष्य केले पाहिजे. नक्की हल्ला कसा झाला, का झाला? कुठे चूक झाली आणि पुढची दिशा काय असणार आहे? हे सांगितले पाहिजे. असे साधे प्रश्नही आम्ही विचारू शकत नाही का? गृहमंत्र्यांना प्रश्न विचारु नये का?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘प्रश्न विचारणारे बाहेर आणि शिव्या घालणारे सभागृहात आहेत. भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या पासवर, त्यांच्या शिफारसीवर हे घुसखोर मुले आली आणि यावर आता चर्चादेखील व्हायला नको का? हा विषय खासदारकीचा नाही. संसदेच्या आवारात एवढे पोलिस असतात, एवढी सुरक्षा व्यवस्था असते, यात त्यांची सुरक्षितता महत्त्वाची नाही का?’ सरकारकडून दडपशाही सुरू आहे, असा आरोपsupriya sule यांनी केला.
खासदारांचे निलंबन
अधिवेशन काळासाठी या सर्व खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत एकूण 92 खासदारांना लोकसभा व राज्यसभेतून निलंबित केले गेले होते आता लोकसभेतून आणखी 49 खासदारांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. इतिहासात पहिल्यांदाच दोन दिवसांत 141 खासदारांना निलंबित करण्याची घटना घडल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.