मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत सात दिवसात संपणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अँक्शनमोड मध्ये आले आहेत. जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. जरांगे आपल्या निर्णयावर ठाम असल्याने सरकार दरबारी आता हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीची तातडीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली आहे. ठाण्यातील महापौर बंगला येथे बैठक सुरु असल्याची माहिती आहे. शिंदे समितीच्या बैठकीनंतर आरक्षणाबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.आरक्षणाबाबतचा दुसरा अहवाल आज शिंदे समितीने दिला तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या (सोमवारी) किंवा मंगळवारी हा अहवाल मांडण्यात येणार असल्याचे समजते. आजच्या बैठकीत आतापर्यंत विविध जिल्ह्यात जाऊन शिंदे समितीने केलेल्या कामाचा आढावा मुख्यमंत्री शिंदे घेणार आहेत.
राज्य सरकार दोन पर्यायांवर काम करीत आहे. यासाठी सरकारला वेळ वाढवून द्यावा,अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने काल (शनिवारी) मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे.