“ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना बळीराजाची चिंता नाही. शेतमालाला बाजार नाही. कांद्या निर्यातबंदी केल्यानंतर शेतक-यांवर संकट ओढवले आहे. बळीराजा संकटात कसा जाईल, असे निर्णय सरकारकडून घेतले जात आहे. पण एकजुटीवर जोरावर महाराष्ट्राचे चित्र लवकरच बदलणार आहे. काहीजण मला म्हणतात तुम्ही ८३ वर्षांचे आहात. पण मी अजूनही तरुणच आहे, लवकरच नवा इतिहास घडविणार,” असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैलगाडा घाटात शेतकऱ्यांसमोर केला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथे “साहेब केसरी” या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहर आणि खेड तालुक्यातील हजारो बैलगाडा शर्यत शौकीनांनी लढत पाहण्यासाठी गर्दी केली होती.
शरद पवारांचा प्लॅन, फुटीरांच्या मनात धडकी भरवणारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दुर्दम्य इच्छाशक्तीसाठी ओळखले जातात. त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात याची अनेकवेळा प्रचीती आली आहे. मी अजूनही तरुण आहे, लवकरच नवा इतिहास घडवणार आहे, असे वक्तव्य त्यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले. त्यामुळे राष्ट्रवादीतून फुटून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह विरोधकांच्या मनात नक्कीच धडकी भरली असणार. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीची घोडदौड सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस स्पर्धेत नाहीत, असेच चित्र होते. नेहमीप्रमाणे विरोधक शरद पवार यांचे ऱाजकीय अस्तित्व नाकारात होते, शरद पवार आता संपले असे नॅरेटिव्ह तयार करत होते. शरद पवार यांनी विरोधकांचा हा डाव हाणून पाडला. विधानसभा निवडणुकीदरम्यान साताऱ्यात सभा सुरू असताना पाऊस सुरू झाला आणि शरद पवार जागचे हलले नाहीत. पावसात भिजत त्यांनी भाषण सुरूच ठेवले. त्यामुळे लोकही जागचे हलले नाहीत.
पावसापासून बचावासाठी लोकांनी खुर्च्या उलट्या करून डोक्यावर घेतल्या. पवारांचे भाषण संपेपर्यंत लोक त्याच अवस्थेत होते. राज्याच्या राजकीय इतिहासात या सभेची नोंद झाली आहे. या एका सभेने निवडणुकीचे चित्र बदलले. त्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काहीजणांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे हा पक्ष दहा, वीस जागांमध्ये गुंडाळला जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शरद पवार यांच्या त्या पावसातील सभेने चित्र बदलले आणि पक्षाचे ५४ आमदार निवडून आले. काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले.शरद पवार यांनी दाखवलेल्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा काही प्रमाणात काँग्रेसलाही फायदा झाला होता. भाजपसाठी हे अनपेक्षित होते, धक्का होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अपेक्षेपेक्षा जास्त आमदार निवडून आले. त्याचा फायदा पवार यांनी पद्धतशीरपणे उचलला. प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू झाला होता.भाजपने अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्याची शिवसेनेचा समज झाला होता. त्यांच्याकडे त्याबाबतचे पुरावेही होते, असे सांगितले जायचे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याच्या वेळी युतीमध्ये मतभेद निर्माण झाले. यात शरद पवार यांची एन्ट्री झाली आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आकाराला आली. सर्व अडथळे पार करत या आघाडीने सरकार स्थापन केले. राष्ट्रवादी ५४, शिवसेना ५६ आणि काँग्रेस ४४ असे मिळून बहुमत झाले. अडीच वर्षे हे सरकार टिकले. नंतर भाजपने नाना क्लृप्त्या योजून हे सरकार पाडले.
महाविकास आघा़डी सरकार स्थापन झाले आणि देश, राज्यात कोरोनाची लाट आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बाहेर न पडता घरात बसून काम केले. देशातील भाजपशासित राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चांगली होती. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर त्यांना मोठी सहानभूती मिळाली.राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर तशीच सहानुभूती शरद पवार यांना मिळाली. ती दूर करण्यासाठी महायुतीचा खटाटोप सुरू आहे. यातच आता शरद पवारांनी शड्डू ठोकल्यामुळे महायुतीतील पक्षांना, विशेषतः अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना घाम फुटला असणार. ”काहीजण म्हणतात, तुम्ही आता ८३ वर्षांचे आहात, मात्र मी अजूनही तरुणच आहे आणि लवकरच नवा इतिहास घडवणार आहे,” असे शरद पवार म्हणाले आहेत.