पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी महाराष्ट्र महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठाच्या संघात निवड
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय व महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा दिनांक १० ते १४ डिसेंबर २०२२ या काळात मोहनलाल सुखदिया विश्वविद्यालय,उदयपूर, राजस्थान येथे होणार आहेत. या आंतरविद्यापीठ बास्केटबॉल पुरुष स्पर्धेसाठी महाराष्ट्र महाविद्यालयाचा विद्यार्थी सय्यद आजम याची निवड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेडच्या बास्केटबॉल संघामध्ये झाली आहे. निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात दिनांक २० व २१ ऑक्टोंबर या काळात झालेल्या आंतरविभागीय आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेमधील खेळाची गुणवत्ता पाहून ही निवड झाली आहे . पश्चिम विभागीय स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक असे सहा राज्य सहभागी होत असतात
याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे ३ ते ७ डिसेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव साठी महाराष्ट्र महाविद्यालायाच्या कु. दिपाली सोळुंके या विद्यार्थिनीची निवड विद्यापीठाच्या हॉलीबॉल संघात झाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कृषी आणि अकृषी असे वीस विद्यापीठाचे संघ सहभागी होणार आहेत. तर क्रीडा महोत्सव अंतर्गत होणाऱ्या बास्केटबॉल स्पर्धेसाठी कु. पवार श्रुती व कु. यशोदा पाटील या विद्यार्थिनींची निवड विद्यापीठाच्या संघात झाली आहे . क्रीडा महोत्सव अंतर्गत उंच उडी या क्रीडा प्रकारासाठी कु.मोरे सपना या विद्यार्थिनी चीही निवड झालेली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या सेंट्रल झोन बॅडमिंटन स्पर्धा, शिरूर ताजबंद येथे पार पडल्या.या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या गौरव पांचाळ व तौफिक लदाफ या विद्यार्थ्यांनी विजेतेपद प्राप्त केले. या सर्व विद्यार्थिनी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. गोपाळ मोघे यांचे मार्गदर्शन लाभले खेळाडूंच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, डॉ. धनंजय जाधव, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे