पुणे येथील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करण्याचा प्रकार सुरु होता. वृषाली ढोले शिरसाठ ही तरुणी युवकांना फसवत होती. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी गंडेदोरे बांधून राख खायला दित होती. पाय धुतलेले पाणी प्यायला देत होती. आपल्याजवळ अंतींद्रिये शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती दाखवत होती. एका युवकाची तिने सुमारे दीड लाख रुपयांमध्ये फसवणूक केली. त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या युवतीचा सर्व भांडाफोड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून स्टिंग ऑपरेशन करून करण्यात आला.
काय आहे प्रकार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल (बोपोडी, पुणे) यांना वृषाली आणि तिचे साथीदार हे जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विशाल विमल आणि फसवणूक झालेला युवक तसेच साध्या वेशातील चतुशृंगी ठाण्याचे पोलीस त्या महिलेच्या कार्यालयात शनिवारी दाखल झाले. त्यावेळी रिसेपशनिस्ट माया गजभिये आणि सतिष वर्मा हे बाहेरच्या रुममध्ये बसले होते. विशाल यांना कन्सल्टींग फी एक हजार रुपये भरावयास लावली. त्यानंतर विशाल यांना आतमधील रुममध्ये जाण्यास सांगितले. आतमध्ये बसलेल्या वृषाली ढोले शिरसाठ यांनी कोणतीही समस्या न विचारता विशाल यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. वृषाली ही आघोरी, अनिष्ठ, जादुटोणा प्रकार करुन लोकांना फसवत असल्याची विशाल यांचीही खात्री झाली. त्यांनी पोलिसांना आतमध्ये बोलावले. पोलिसांनी आतमध्ये येऊन पंचनामा करुन जादूटोण्याच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पाषाण परिसरातील 23 वर्षीय युवकाने वृषाली संतोष ढोले शिरसाठ विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जादूटोणा विरोधी कायदा कलम 3(2) आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 420, 506(2), ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणी पुढील कार्यवाही चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव, पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार करत आहेत.वृषाली संतोष ढोले शिरसाठ (वय – 39, रा. वंशज गार्डन, पाषाण) या महिलेसह साथीदार माया राहुल गजभिये ( वय- 45, रा. विठ्ठलनगर, पाषाण) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा (वय – ३३, रा. गणेश हॉस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.