मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे-पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात भेट घेतली. यावेळी तरूणांवर होत असलेल्या गुन्ह्यांवरून मनोज जरांगे-पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आमच्याशी दगाफटका झाला आहे. आमच्या लोकांना विनाकारण अटक करण्यात आली,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.जरांगे-पाटील म्हणाले, “माजलगावमधील मुलं शिकवण्यासाठी बाहेर गावी आहेत. तरीही, पोलीस त्यांच्या घरी गेले होते. शाहगड आणि अंतरवालीच्या बाबातही तेच चालू आहे. आमच्याशी दगफटका झाला आहे. तुम्ही सगळ्यांना अटक करणार असल्याचं आम्ही धरून चाललो आहे. पण, आमच्याशी धोका झाला आहे. गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देऊनही आमच्या लोकांना विनाकारण अटक करण्यात आली आहे.”
“अंतरावालीतील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण, तीन महिने झालं, अद्यापही घेण्यात आले नाहीत. तुमचे शब्द मराठा समाजानं मोडायचे नाही. पण, आमच्या एक-एक जणाला अटक करण्यात येत आहे. सगळ्यांना नोटीस पाठवण्यात येत आहे. कशी तुमच्याशी चर्चा करायची?” असा सवाल जरांगे-पाटलांनी गिरीश महाजनांना विचारला आहे.
गिरीश महाजन काय म्हणाले?
“आम्हाला कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं आहे. कुठेही घाईत निर्णय घ्यायचा नाही. कायदेतज्ञ मराठा आरक्षणावर अभ्यास करत आहेत. हक्काचं आरक्षण निश्चित मिळणार आहे. २४ डिसेंबरचा आग्रह मनोज जरांगे-पाटलांनी सोडावा,” अशी विनंती गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आली आहे.