• Sun. May 11th, 2025

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांच्या समावेशासाठी  विशेष मोहिमेचे आयोजन

Byjantaadmin

Dec 13, 2023

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांच्या समावेशासाठी  विशेष मोहिमेचे आयोजन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

लातूर, (विमाका) : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी केंद्र शासनाने 6 डिसेंबर, 2023 ते 15 जानेवारी, 2024 या कालावधीत गावपातळीवर 45 दिवसांची विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश  दिले आहेत. त्या अनुषंगाने कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागांना या विशेष माहिमेची यशस्वी अंमलबजावणी  करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची स्वयं नोंदणी व ई-केवायसी साठी सर्व सामाईक सुविधा केंद्र तर आधार संलग्न बँक खती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांना सहभागी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी  या 45 दिवसांच्या मोहिमेच्या माध्यमातून  आवश्यक बाबींची पुर्तता करून घेत पी.एम किसान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि संचालक(विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

पी.एम.किसान योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती,पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) दोन हजार रूपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी सहा हजार रूपये लाभ देण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई केवायसी केलेले शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

या 45 दिवसांच्या विशेष माहिमेमध्ये ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लाभार्थ्यांची योजनेतील सद्यस्थिती तपासणे व ई-केवायसी करणे, पोर्टलवर नोंदणी करतांना जमिनीचा तपशील भरणे, चेहरा ओळखणाऱ्या (फेस ऑथेंटिफिकेशन) ॲपचा वापर करून ई-केवायसी करणे यासाठी शेतकऱ्यांना मदत करतील. तसेच लाभार्थींची बँक खाती आधारसंलग्न केली असल्याची खातरजमा करतील. गावातील पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन योजनेच्या निकषांनुसार तपासणीअंती पात्र लाभार्थ्यांना पी.एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यात येईल. तसेच विशेष मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी विशेष ग्रामसभेंचे आयोजनही करण्यात येणार आहे.

पी.एम. किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, केवायसी करणे, बँक खाते आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यासाठी पी.एम.किसान योजनेच्या लाभासाठी या 45 दिवसांच्या मोहिमेमध्ये योजनेच्या निकषांच्या अधिन राहून शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची पुर्तता करून घ्यावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *