• Fri. May 2nd, 2025

लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून २ तरुणांच्या उड्या, रंगीत धूर सोडला; संसदेत गोंधळ

Byjantaadmin

Dec 13, 2023

नवी दिल्ली: संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण होत असताना संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. प्रेक्षकांसाठीच्या गॅलरीमधून दोन जणांनी लोकसभेत उड्या टाकल्या. आसपास असलेल्या खासदारांनी दोघांना पकडलं. त्यानंतर लोकसभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सदनात जनहिताच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. पश्चिम बंगालचे भाजप खासदार खगेन मुर्मू भाषण करतेवेळी दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे खासदारांसह सारेच गोंधळले. यानंतर पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी कामकाज दुपारी २ पर्यंत स्थगित केलं.लोकसभेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन तरुणांनी तिथून खाली उडी मारली. त्यानंतर ते एका बाकावरुन दुसऱ्या बाकावर उड्या मारत पळत होते. एकानं बूटातून स्प्रे काढला. त्यात पिवळ्या रंगाचा वायू होता. त्यानं स्प्रे मारल्यानंतर सदनात पिवळा धूर पसरला. खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडलं आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब करण्यात आलं.

sandad

 

लोकसभेत शून्य प्रहरात भाजप खासदार खगेन मुर्मू बोलत होते. त्यावेळी प्रेक्षक गॅलरीतून एकानं उडी मारली. तो आधी बॅरिअरला लटकला. त्यानंतर त्यानं सदनात उडी टाकली. यानंतर त्याच्या मागून दुसऱ्यानंही सभागृहात उडी मारली. संसदेत एकच गोंधळ उडाला. काही खासदार सभागृहातून बाहेर पडण्यासाठी पळू लागले. काही खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडलं. त्यानंतर संसदेचे सुरक्षा रक्षक धावले. त्यांनी दोघांना पकडलं आणि संसद मार्ग पोलीस ठाण्यात नेलं. दिल्ली पोलिसांचं अँटी टेरर पथक त्यांची चौकशी करण्यासाठी पोहोचलं आहे.संसदेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून उड्या टाकणाऱ्या दोघांपैकी एकाचं नाव सागर असल्याचं कळतं. दोन्ही तरुण लोकसभेचा व्हिजिटर पास घेऊन आले होते. म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावे लोकसभा व्हिजिटर पास घेऊन दोन तरुण आले होते, अशी माहिती खासदार दानिश अली यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *