• Sat. May 3rd, 2025

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाण नकोसा!

Byjantaadmin

Dec 13, 2023

नागपूर: राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेतील तिन्ही राज्यात एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नाणे खणखणीत वाजेल, असा जाणकारांचा होरा आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील खासदारांना आता शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढण्याऐवजी भाजपच्या कमळ या चिन्हावर लढण्याचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हिवाळी अधिवेशन सुरु असलेल्या नागपूरमध्येही या विषयाची जोरदार चर्चा सुरु आहे. याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारणा करण्यात आली. मात्र, नाना पटोले यांनी यावर फारसे बोलणे टाळले. शिंदे गटाच्या खासदारांना कमळाच्या चिन्हावर लढायचे असेल तर तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मला त्यावर चर्चा करायची नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले. मात्र, यानिमित्ताने शिंदे गटात सुरु असलेल्या राजकीय खलबतांची उघडपणे चर्चा सुरु झाली आहे.

BJP Eknath Shinde Camp

 

शिंदे गटातील खासदारांचा नेमका प्रस्ताव काय?

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये भाजपने मोदींच्या नावावर निवडणूक लढवली होती. या राज्यांतील मतदारांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या कमळ चिन्हाला भरभरुन मतं दिली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही ‘कमळा’ची चलती राहण्याची शक्यता आहे. हीच गोष्ट हेरून शिंदे गटाच्या काही खासदारांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचे कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने अद्याप हा प्रस्ताव मान्य केलेला नाही.निवडणूक आयोगातील कायदेशीर लढाईनंतर आणि बऱ्याच संघर्षानंतर शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. अशात आता शिंदे गटाच्या खासदारांनी धनुष्यबाण चिन्ह सोडून कमळावर लोकसभा निवडणूक लढवली तर ते टीकेचे धनी होतील. यामुळे निर्माण होणाऱ्या सहानुभूतीचा फायदा ठाकरे गटाला मिळू शकतो. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेण्यासाठीच शिंदे गट व भाजपने निवडणूक आयोगात कायदेशीर लढाईचा घाट घातला, असा संदेश मतदारांमध्ये जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांना कमळ चिन्हावर लढू देण्यास, भाजप मान्यता देईल का, हे पाहावे लागेल. शिवसेनेच्या एकूण १८ खासदारांपैकी १३ खासदार हे सध्या शिंदे गटात आहेत. या १३ जागांवर भाजपच्या पाठिंब्याने निवडणूक लढवण्याची शिंदे गटाची रणनीती आहे. मात्र, भाजप शिंदे गटासाठी १३ पैकी १३ जागा सोडण्यास सहजासहजी तयार होणार नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांचा कमळाच्या चिन्हावर लढण्याच्या प्रस्ताव भाजप मान्य करेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *