• Tue. Apr 29th, 2025

बाबा, तुम्ही सर्व अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल! शरद पवारांच्या वाढदिवसाला लाडक्या लेकीची खास पोस्ट

Byjantaadmin

Dec 12, 2023

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस असून ते वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सगळ्यात शरद पवार यांची कन्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये शरद पवार यांच्या सतत कार्यशील राहण्याचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar Supriya Sule

सुप्रिया सुळेंनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.
मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.
कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे.
मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.
संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे.
लढेंगे-जितेंगे !!
बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed