माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची हिवाळी अधिवेशन कामकाजास उपस्थिती, विविध प्रश्नाच्या अनुषंगाने सभागृहातील चर्चेत सहभाग.
नागपूर / लातूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विधी मंडळाचे तृतीय हिवाळी अधिवेशन २०२३ सद्या नागपूर येथे सुरू असून यात राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक
कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी विधानभवनात उपस्थिती लावून विधीमंडळ सभागृग्रहाच्या दैनंदिन कामकाजात सहभाग नोंदविला. यावेळी महाराष्ट्र राज्यातील टोल वसुली, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा, दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यासोबतच इतर प्रश्नाच्या अनुषंगाने सभागृहात काँग्रेस पक्षाच्या वतीने घडवून आणलेल्या चर्चेत सहभाग घेतला. दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार बाबासाहेब पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर विधान भवन परिसरात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन कामकाज कशा प्रकारे चालते हे समजून घेण्यासाठी सकाळी नागपूर विधान भवन परिसरात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भेट घेतली. नागपूर येथील काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी आलेले लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, किरण जाधव तसेच विलास को-ऑपरेटिव बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल यांचीही विधान भवन परिसरात भेट घेतली, यावेळी त्यांच्याशी चर्चा केली.