मुंबई : ‘तब्बल चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेतून ४७९ कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढल्या आहेत. कर्ज आणि ठेवी यांचा ताळमेळ बसत नसल्याने कर्जवाटपावर मर्यादा आल्या आहेत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे खाते असलेली बँक वाचवण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करावी’, अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
राज्यातील ५० हून अधिक शाखांमध्ये ६२ हजार एसटी कर्मचारी बँकेचे खातेदार आहेत. बँकेत नवे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर व्यवस्थापनात हुकूमशाही सुरू आहे. नियम डावलून बँकेत ३७ जणांची भर्ती करण्यात आली. ठेवी काढल्याने सीडी रेशो ९५.३५ टक्क्यांवर गेला आहे. राज्य सरकारच्या सहकार खात्याचे बँकेकडील दुर्लक्ष याला जबाबदार आहे. सभासदांनी मागणी केल्यानंतर बैठक ही लावण्यात येत नाही. संचालकांच्या मताशिवाय कर्जवाटप होत असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप बरगे यांनी केले.
‘गुणरत्न सदावर्ते यांच्या पुढाकाराने बँकेत अनागोंदी कारभार सुरू आहे. सरकार सदावर्ते यांच्या दबावाला बळी पडत आहे. रिझर्व्ह बँकेने एसटी बँकेला कर्जवाटप करू नये, असा सावध इशारा दिला आहे. अनियंत्रित कर्जवाटप आणि अयोग्य भरती यांमुळे एसटी बँक डबघाईला जाण्याचे संकेत आहेत. बँकेच्या सभासदत्वचा राजीनामा देणाऱ्यांची संख्या वाढली असून, अंदाजे चार हजार सभासद कमी झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
सदावर्ते दाम्पत्याला मंडळातून काढा
गुणरत्न सदावर्ते यांचे मेहुणे सौरभ पाटील यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केल्यापासून बँकेचा व्यवहार तोट्यात आला आहे. सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनमानी निर्णयांमध्ये सभासदांनी १८० कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या. त्यामुळे सदावर्ते व त्यांच्या पत्नीला बँकेच्या तांत्रिक मंडळावरून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांनी सोमवारी सभागृहात केली.