भोपाळ: मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांची निवड करण्यात आली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचे निकाल ३ डिसेंबर रोजी लागले होते. निकालात भाजपने १६३ जागांसह मोठा विजय मिळवला होता. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर गेल्या ७ दिवसांपासून राज्यातील जनता नव्या मुख्यमंत्र्याची वाट पाहत होते. अखेर आज नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा झाली.
मुख्यमंत्री यांच्या सोबत राज्यात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. जगबीर देवडा आणि राजेश शुक्ला हे दोन उपमुख्यमंत्री असतील. नरेंद्र तोमर हे विधानसभेचे अध्यक्ष असतील. राज्यात भाजपने दलित मुख्यमंत्री आणि ब्राम्हण याचे समीकरण केले आहे. गेल्या १६ वर्षापासून मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंह चौहान यांच्याकडे राज्याचे नेतृत्व आहे. अखेर राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत.मोहन यादव हे शिवराज सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. उज्जैन दक्षिणचे मतदार संघाचे ते आमदार आहेत. यादव हे RSSच्या जवळचे मानले जातात. भाजपने ओबीसी चेहरा म्हणून यादव यांना पुढे केले आहेत.
असा आहे मोहन यादव यांचा राजकीय प्रवास
१९६५ साली जन्मलेल्या यादव यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून १९८४ साली राजकारणात प्रवेश केला. त्यांच्याकडे उज्जैनची जबाबदारी दिली होती. १९८६ साली त्यांच्याकडे एबीव्हीपीच्या विभाग प्रमुखची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर लवकरच प्रदेशसह मंत्रीपदाची जबाबदारी दिली गेली. RSS मध्ये विद्यार्थी विभागाचे राष्ट्रीय मंत्री पदावर त्यांनी काम केले. त्याच बरोबर सह खंड कार्यवाह आणि नगर कार्यवाह म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. १९९७ साली भाजपच्या युवा मोर्चामध्ये त्यांनी प्रवेश केला. २००३ साली मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले. २०११ साली शिवराज यांनी राज्य पर्यटन विकास मंडळाचे अध्यक्षपद यादव यांच्याकडे दिले. २०१३ साली आमदार झाल्यानंतर त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. २०२० साली राज्य मंत्रीमंडळात उच्च शिक्षण मंत्री म्हणून त्यांना जबाबदारी दिली गेली.