बंदी असूनही निलंगा शहर व तालुक्यात गुटखा विक्री जोमात
निलंगा प्रतिनिधी-चोरट्या मार्गाने बंदी असलेला गुटखा हा पान मसाल्याच्या नावाखाली विक्री होत आहे. याला अन्न औषध प्रशासनचे अभय असल्याचे बोलले जात आहे. राज्यात २० जुलै २०१२ रोजी गुटखाबंदीचा निर्णय झाला. या निर्णयाला ११ वर्षे पूर्ण झाली. परंतु, कठोर
अंमलबजावणीअभावी चोरट्या मार्गाने गुटखा येऊन तो गावोगावी पोहोचवून विक्री करणारी टोळी तालुक्यात सक्रिय आहे. अनेकदा लाखोंचा तर कधी हजारोंचा अवैध विक्रीसाठी आणलेला गुटखा साठा पकडला जातो. परंतु, नंतर पुन्हा गुटखा विक्री सुरू राहते. आज सहज कुठेही शहरात किंवा ग्रामीण भागात गुटखा भेटू लागल्याने अनेकजण याच्या आहारी जात आहेत.
गुटखा सेवनाच्या आहारी अनेक तरुण जात आहेत. याचे सेवन करणाऱ्यांना जीवघेणे कर्करोगाबरोबर मुख व दाताचे आजार जडत आहेत. कोणाचे तोंड उघडत नाही. गंभीर आजार होऊनही व्यसनाधीनता वाढतच आहे. पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत – गुटखा खाणारे अनेकजण आहेत.कायद्यातून पळवाटा शोधून चोरट्या मार्गाने विक्री होते. शिरूर अनंतपाळ तालुक्यात ग्रामीण भागात गाव, वाडी, तांड्यावर गुटखा सहज कुठेही भेटू लागल्याने याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस
वाढत आहे. दुसरीकडे सतत गुटखा सेवन केल्याने तरुण व वयस्कर यांना आजार जडत आहेत. काही तोंडाचे जीवघेण्या आजारास सामोरे जावे लागते. या भागात सतत गुटखा सेवन करणाऱ्या काहीजणांना मोठे आजार झाल्याने औषधोपचार करावे लागत आहेत.
व्यसनाधीनता रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक
आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटख्यावर राज्यात बंदी असूनही अनेक वर्षांपासून बाहेरील राज्यातून चोरट्या मार्गाने गुटखा येतो. मात्र यावर ठोस कारवाई होत नाही. गुटखा सहज मिळत असल्याने व्यसनाधीन तरुणांची संख्या वाढत आहे. हे रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.