राज्यातील सत्ता ज्यांच्या हाती आहे, निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, त्याच मंत्र्यांचा मुलगा जर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करणार असेल तर याला काय म्हणावे. राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणनमंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभाराचे कौतुक करताना थकत नाहीत. शेतकऱ्यांसाठी शिंदे किती काम करतात, याचा उल्लेख सत्तार वारंवार आपल्या भाषणातून करत असतात.
एकीकडे राज्याच्या वेगवान कारभार, सगळ्या वर्गांचा विकास होत असल्याचा दावा आणि दुसरीकडे याच सरकारमधील मंत्र्यांचा मुलगा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा म्हणून मोर्चा कढणार.abdul sattar यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील सोयगाव तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये करण्यात आला आहे.परंतु सिल्लोड तालुक्यातील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आलेली असतानाही हा तालुका वगळण्यात आल्याचा दावा करत सत्तार यांचे चिरंजीव उपनगराध्यक्ष समीर सत्तार यांनी सिल्लोड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. येत्या ११ नोव्हेंबर रोजी म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधीच हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार आहे. मंत्र्यांचा मुलगाच आपल्या सरकारविरोधात मोर्चा काढणार असल्याने याची चर्चा होत आहे.