नागपूर : वाढत्या वायूप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासह शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेने दिवाळी सणादरम्यान फटाके फोडण्यासाठी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजतापर्यंतची वेळ निर्धारित केली आहे. त्याचबरोबर शहरातील बांधकाम साहित्याचा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भातही निर्देश जारी केले आहेत. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या आदेशानंतर यासंबंधीचे दिशानिर्देश मंगळवारी जारी करण्यात आले.
मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उपाययोजना करण्यासाठी आदेश दिल्यानंतर नागपुरातही यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी दिशानिर्देश जारी केले. यानुसार वायू गुणवत्ता संचालन विभागाच्या नोडल अधिकारी डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केले. तसेच संबंधित विभागांना याबद्दल त्यांच्या स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिस आयुक्तांनी दिवाळीत रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके फोडता येतील, असे जाहीर केले होते. उच्च न्यायालयाने फटाके फोडण्याच्या वेळांचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यवाहीची जबाबदारी महापालिकेसह शहर पोलिसांची असल्याची सूचना केली आहे. शहरातील वायूप्रदूषण वाढत असून ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. शहरातील वायूप्रदूषण नियंत्रणासाठी याबाबत निरंतर कार्यवाही गरजेची असून त्यादृष्टीने महापालिकेकडून ही पाऊले उचलण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
– फटाक्यांपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वेळा निश्चित करताना शहरामधील बांधकांम स्थळांबाबतही दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.
– इमारत बांधकाम स्थळावरील धूळ उडू नये व ते धुळीकण हवेत मिसळू नयेत, यासाठी बांधकाम स्थळी लोखंडी पत्रे लावावेत; तसेच सतत पाण्याची फवारणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
– राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास यांच्याद्वारे शहरात कार्य सुरू असलेल्या सर्व ठिकाणीदेखील नियमित पाण्याची फवारणी करण्याचे आवश्यक दिशानिर्देशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
– बांधकाम स्थळांवर वा अन्य ठिकाणी जमा असलेल्या सी अॅण्ड डी कचऱ्याचे धुलीकण हवेत मिसळू नयेत, यासाठी हा कचरा पूर्णपणे झाकलेला असावा, याशिवाय बांधकाम मलबा ट्रकमधून डम्पिंग यार्डमध्ये घेऊन जाताना तोदेखील पूर्णपणे झाकलेला असावा.
– रेडी मिक्स क्राँक्रिट तसेच बांधकाम साहित्यही झाकूनच आणले व नेले जावे, अशी देखील सूचना महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.
– कचरा जाळण्यावरही बंदी
शहरात कुठेही कचरा जाळण्यास बंदी आहे. कचरा जाळणाऱ्यांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठेही कचरा जाळला जाऊ नये, याबाबत देखील निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या ‘आपली बस’ ताफ्यातील सर्व बसेस आणि सर्व शासकीय वाहनांचे पीयूसी तपासण्याचे देखील महापालिकेच्या परिवहन विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. फटाके फोडल्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणावर होणारे विपरित परिणाम यासंबंधी शहरातील सर्व शाळांमधून जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी मनपा शिक्षण विभागाला कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.