• Tue. Apr 29th, 2025

डीजेच्या दणदणाटात मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Byjantaadmin

Nov 8, 2023

बुलढाणा : डीजेच्या आवाजात सुरु असलेल्या मिरवणुकीत नाचताना कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सहा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली होती. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सतीबाई भागातील २७ वर्षीय युवकाला प्राण गमवावे लागले. मंगळवारी स्थानिक सामान्य रुग्णालयात तरुणाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तरुणाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या शवविच्छेदन अहवालावरील मत तज्ज्ञांनी राखून ठेवल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे.

Buldhana DJ Dance Youth Death 900

खामगाव शहरातील सतीबाई भागातील युवराज उर्फ नटवर सुरेश यादव या युवकाला सोमवारी रात्री मिरवणुकीत नाचताना अस्वस्थ वाटू लागले. भोवळ येऊन कोसळल्यानंतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी धावपळ केली. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. कारण तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर युवकाचा मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. निर्मल टर्निंग मोठ्या पुलावर घडलेल्या या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली.मंगळवारी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात युवकाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा विसेरा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. डॉक्टरांनी अहवाल राखून ठेवला आहे. त्यामुळे या युवकाचा मृत्यूचे गूढ वाढले आहे.

काहींना रातआंधळेपणाचा त्रास

सोमवारी पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेवर वापरण्यात आलेल्या लेझर किरणांमुळे काही जणांना सोमवारी रातआंधळेपणाचा त्रास झाला. यापूर्वी नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीतही चार ते पाच युवक अशाच प्रकारच्या त्रासाने ग्रस्त होऊन उपचारासाठी आल्याची खामगावात चर्चा आहे.

युवकाचा मृत्यू, तर अनेकांना भोवळ

डीजेच्या कर्णकर्कश्श आवाजामुळे घटनास्थळीच युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान या काळात अनेकांना भोवळ आल्याचा दावाही परिसरात केला जात आहे. तर काही जणांना कानठळ्या बसल्याचीही प्रकरणे समोर येत आहेत.

ध्वनीमापक मापक यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर

खामगाव शहरातील गणपती दुर्गा देवी जगदंबा उत्सवा सोबतच इतर धार्मिक उत्सवात डीजेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. अलिकडच्या काळात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अकोला जिल्ह्यातील डीजेही इथे येत असल्याचे समोर आले आहे, मात्र पोलीस प्रशासनातर्फे या डीजे ध्वनीमापक यंत्रणांकडून तपासणी केली जात नसल्याचे दिसून येते. त्यावेळी पोलीस मोठ्या आवाजातील डीजेला परवानगी देतात कशी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

व्यावसायिकांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन खामगाव शहरात डीजेमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचे निवेदन मुख्य रस्त्यावरील व्यावसायिकांनी दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दिले. या निवेदनावर मुख्य रस्त्यावरील विविध प्रतिष्ठानच्या संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed