बसवकल्याणमध्ये ४४ व्या अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन : डॉ. बसवलिंग पट्टदेवरू
लातूर : लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर आणि समकालीन शरणांची कायकभूमी, कर्मभूमी असलेल्या बसवकल्याणमध्ये येत्या दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ४४ व्या अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अनुभव मंटपचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र बसव परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प.पू. डॉ. बसवलिंग पट्टदेवरू आप्पाजी यांनी मंगळवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
या उत्सवाचे औचित्य साधून दि. १९ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत कावळगाव – मरखेल ते बसवकल्याण अशी पदयात्राही काढण्यात येणार आहे. महात्मा बसवेश्वरांनी याचा ऐतिहासिक नगरीत १२ व्या शतकात जगातील पहिल्या लोकशाही संसदेचे प्रारूप असलेल्या अनुभव मंटपाची स्थापना केल्याचे सर्वज्ञात असल्याचे सांगून प.पू. आप्पाजी पुढे म्हणाले की, या दोन दिवसीय अनुभव मंटप उत्सवास शनिवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता षट्स्थल ध्वजारोहणाने सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता या उत्सवाचे उद्घाटन कर्नाटकच्या विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटकचे वन संपदा मंत्री ईश्वर खंड्रे हे राहणार आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती शिवराज पाटील याना ‘ श्री चन्नबसव पट्टदेवरू पुरस्काराने तर ज्येष्ठ संशोधक डॉ. बी.व्ही. शिरूर यांना ‘ डॉ.एम.एम. कलबुरगी साहित्य – संशोधन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक विजेते आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी राज्यमंत्री रहीम खान, बसवकल्याणचे आमदार शरणु सलगर, आमदार अरविंद आरळी, चंद्रशेखर पाटील, भीमराव पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यात महाराष्ट्र बसव परिषदेने मुद्रित केलेल्या ९ पुस्तकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता ‘ लिंगायत स्वतंत्र धर्म : आव्हाने आणि परिहार ‘ या विषयांवर परिसंवाद होणार असून या परिसंवादात जगदगुरु डॉ. गंगादेवी माताजी, प.पू. कोरनेश्वर आप्पाजी यांचे मार्गदर्शन होणार आहे. याचा विषयावर डॉ. जी.एस. पाटील व विश्वाराध्य सत्यंपेटे यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात ‘ महाक्रांती ‘ नाटकाचा प्रयोग होईल.
रविवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सामूहिक इष्टलिंग पूजा आणि सकाळी १० वाजता ‘ अनुभव मंटप आणि महिला आरक्षण ‘ या विषयावरील परिसंवाद होईल. या परिसंवादात डॉ. शिवगंगा रुम्मा आणि डॉ. राजशेखर सोलापुरे यांची व्याख्याने होतील. दुपारी १२ वाजता इस्रो चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांना चंद्रयान – ३ चे यशस्वी उड्डाण घडवून देशाची कीर्ती उंचावल्याबद्दल ‘ अनुभव मंटप राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी इस्रो चे माजी अध्यक्ष ए.एस. डॉ. किरणकुमार हे भूषविणार आहेत. समारोप प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा राज्यातून हजारोंच्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती राहणार आहे. या अनुभव मंटप उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही प.पू. डॉ. बसवलिंग पट्टदेवरू आप्पाजी यांनी केले. या पत्रकार परिषदेस माधवराव पाटील टाकळीकर, डॉ. अरविंद भातांब्रे, बालाजीआप्पा पिंपळे, सोनू डगवाले , राजेश्वर जुबरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.
बसवकल्याणमध्ये ४४ व्या अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन : डॉ. बसवलिंग पट्टदेवरू
