• Wed. Apr 30th, 2025

एक कोटी रुपये मिळताच फोन लावला, ‘सर, पैसे मिळाले आहेत, तुमचे ५०% कुठे पाठवू

Byjantaadmin

Nov 5, 2023

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मोठी कारवाई केली. दोन अभियंत्यांना लाच प्रकरणात कारवाई केली. ही लाच अहमदनगर एमआयडीसीतील लोखंडी पाइपलाइन बदलण्यासाठी ठेकेदारला दिलेल्या कामांसाठी मागितली गेली होती. ३१ कोटी ५७ लाखांच्या कामाची अनामत रक्कम २ कोटी ६७ लाख रुपये मिळवून देण्यासाठी ही लाच मागितली गेली. छत्रपती संभाजीनगर येथील ठेकेदाराकडून ही लाच मागण्यात आली होती. त्याने केलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाने तब्बल पंधरा दिवस फोन कॉल रेकॉर्ड केले. त्यानंतर कारवाईसाठी सापळा रचला. या सापळ्यात सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड याला शुक्रवारी रंगेहाथ पकडले.

एक कोटी रुपये मिळताच फोन लावला, ‘सर, पैसे मिळाले आहेत, तुमचे ५०% कुठे पाठवू

 

पैसे मिळाल्यानंतर असे झाले संभाषण

ठेकेदाराकडून एक कोटी रुपये मिळल्यावर अमित गायकवाड याने गणेश वाघ याला फोन केला. ‘सर, पैसे मिळाले आहेत, तुमचे ५०% कुठे पाठवू सांगा..’ त्यानंतर आनंदाने गणेश वाघ म्हणाला, ‘अरे व्वा व्वा.. सध्या तुझ्याकडेच ठेव. तुलाच ते पोहोचवायचे आहेत, ठिकाण कळवतो. तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळालेच’ असे संभाषण लाचलुचपत विभागाने रेकॉर्ड केले आहे. या दोघांमधील संभाषण संपल्यावर एसीबीने गायकवाड याला एक कोटी रुपयांसह ताब्यात घेतले.

कोण आहे गणेश वाघ

गणेश वाघ हा सध्या धुळे येथे कार्यकारी अभियंता आहे. पूर्वी तो अहमदनगर एमआयडीसीत अभियंता होता. या कामाच्या बिलावर वाघ यांच्या सह्या घेऊन बिल मंजूर करण्याच्या बदल्यात गायकवाड याने एक कोटी रुपये मागितले होते. लाच घेण्यासाठी वाघ आणि गायकवाड यांनी संगनमत केले. यासंदर्भातील तांत्रिक पुरावेसुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागास मिळाले आहेत. परंतु गायकवाड याच्यावर कारवाई झाल्याचे कळताच वाघ फरार झाला आहे. एसीबीच्या पथकाने वाघ याचे पुणे येथील घर सील केले आहे. तसेच गायकवाड याचे नगरमधील घरही सील करण्यात आले आहे. नाशिकच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून कारवाई केली आहे. यासंदर्भात अनेक पुरावे  देखील पथकाला मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed