• Wed. Apr 30th, 2025

7 वा आयोग मिळाला म्हणून आधी गुलाल उधळला?

Byjantaadmin

Nov 5, 2023

एसटी कर्मचाऱ्यांचे 6 नोव्हेंबर पासून आझाद मैदानात पुन्हा एड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे. गेल्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांचे पाच महिने प्रदीर्घ आंदोलन झाले. तेव्हा सातवा आयोग लेखी मान्य झाला म्हणून आझाद मैदानात गुलाल उधळणारे सदावर्ते आता पुन्हा का आंदोलन करीत आहेत.एड. गुणरत्न सदावर्ते  यांची भूमिका दुटप्पी असून कामगार आता त्यांच्या काव्याला बळी पडणार नाहीत असे एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी म्हटले आहे.

 

ST Strike | 7 वा आयोग मिळाला म्हणून आधी गुलाल उधळला, आता सदावर्ते पुन्हा एसटी कामगारांची दिशाभूल करत आहेत, कोणी केला आरोप

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा एसटी कष्टकरी जनसंघाचे नेते गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली उद्या 6 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात पुन्हा आंदोलन होत आहे. या आंदोलनास आपला पाठींबा नसल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. संपात सहभागी कर्मचाऱ्यांना सेवा सलगता मिळाली असे जाहीर करून सदावर्ते यांनी आझाद मैदानात गेल्यावेळी गुलाल उधळला होता. मग आता पुन्हा सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी त्यांच्याकडून करणे ही दिशाभूल आहे. यामागे स्पष्ट लबाडी दिसत असल्याचे श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.

पूर्वीच्या सरकारने गठीत केलेल्या समितीचे निर्णय मान्य नव्हते तर त्यास त्यावेळी न्यायालयात आव्हान का दिले नाही ? याशिवाय काल-परवाच राज्य सरकारने 8 टक्के महागाई भत्ता जाहीर केला आहे. त्याचा फरक मात्र सरकारने दिलेला नाही. त्याबद्दल सरकारला जाब का विचारला जात नाही ? आज प्रसारमाध्यमांसमोर बोलताना वकील महाशयांनी एसटीच्या जुन्या गाड्यांच्या कामासंदर्भातील लॉगसीटवरील शेऱ्यांचा उल्लेख केला आहे. आणि तशी ध्वनीफीत सुद्धा व्हायरल झाली आहे. पण नवीन गाड्या उशीरा येण्यास विद्यमान सरकार जबाबदार असून 2200 नव्या गाड्या घेण्याची फाईल गेले अनेक दिवस धुळ खात पडून आहे. त्यासाठी 900 कोटी रुपयांच्या निधीची बजेटमध्ये तरतूद केली आहे. मग ती फाईल प्रलंबित ठेवण्यामागील हेतू काय ? याचा जाब सरकारला का विचारला जात नाही असेही बरगे यांनी म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांची दिशाभूल

एसटी कर्मचाऱ्याना संपकाळात दिलेली वेतनवाढ चुकीची असून त्यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे. याशिवाय गेली अनेक वर्षे महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नाही. तो दिला पाहिजे. आणि हे सरकारचे काम असून त्यांना जाब विचारण्याऐवजी प्रशासनाला नोटीस देऊन कर्मचाऱ्यांनी दिशाभूल केली जात आहे, असाही आरोप श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed