मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतेमनोज जरांगे पाटील यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. आपली प्रकृती चांगली आहे. मी ठणठणीत आहे. काळजी करु नका. डॉक्टरांनी मला ठणठणीत बरे केले आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. परंतु आता चांगले दिवस आले आहे. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी आपण काय, काय करणार आहोत, ते त्यांनी स्पष्ट केले.
१ डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण
मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरु होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार आहे. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहे.
उद्रेक होईल असे आंदोलन करु नका
आपले आंदोलन शांततेचे आणि लोकशाही मार्गाचे आहे. उद्रेक होईल, असे काही करु नका. कोणी आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. न्याय मिळवण्यासाठी सातत्य ठेवावे लागणार आहे. आतापर्यंत आमच्यावर खूप अन्याय झाला आहे. हक्काचे आरक्षण आम्हाला मिळाले नाही. आम्हाला शेती पाहायची आहे आणि मुलांसाठी काम करायचे आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.