सोलापूर: नाशिक शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोलापूरमध्ये चिंचोळी एमआयडीसीत येऊन दोन हजार लीटर केमिकल साठा जप्त केला आहे.हा केमिकल ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एमडी ड्रग्ज अंमली पदार्थ कारखान्याप्रकरणी दहाव्या संशयित वैजनाथ हळवे या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.अटक झाल्यानंतर वैजनाथ हळवे या कडून मिळालेल्या माहितीनुसार एमडी अंमली पदार्थ बनविण्यासाठी महत्त्वाचे असलेले टू- क्लोरो प्रोपियोनाईल क्लोराईड नावाचे दोन हजार लीटर केमिकल जप्त करण्यात आले आहे.ड्रग्ज रॅकेट मधील फरार असलेल्या दोन संशयितांचा मुंबई पोलीस,नाशिक पोलीस कसोशीने तपास करत आहेत.नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे .राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत,पण या सर्वांचे कनेक्शन थेट सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी पर्यंत येत आहे.
ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा दोन हजार लीटर केमिकल साठा जप्त
सोलापूरमधील चिंचोळी एमआयडीसीत एमडी ड्रग्जचा कारखाना उद्धवस्त केल्यानंतर पोलिसांना संशयितांकडे केलेल्या चौकशीत सोलापूरमधील वैजनाथ सुरेश हळवे (रा. मोहोळ, सोलापूर) याचा देखील यामध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली होती. नाशिक पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी वैजनाथ हवळे याला याप्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची चार दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. नाशिक पोलिसांनी हळवे याची कसून चौकशी केली असता, सोलापूरमध्ये नाशिक अंमली विरोधी पथकाने ज्या ठिकाणी एमडी बनवणारा कारखाना उद्धवस्त केला तेथूनच काही अंतरावर दुसऱ्या एका कारखान्यातून एमडी ड्रग्ज अंमली पदार्थ बनवण्यासाठी महत्त्वाचे असलेले टू- क्लोरो प्रोपियोनाईल क्लोराईड दोन हजार लीटर केमिकल शुक्रवारी जप्त केले.
चिंचोळी एमआयडीसी पुन्हा एकदा चर्चेत
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेली चिंचोळी एमआयडीसी ड्रग्जच्या बाजारात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.सर्वात अगोदर मुंबई पोलिसांच्या टीमने गवळी बंधूना अटक केल्या नंतर सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसीत कारवाई केली होती.त्यानंतर काही दिवसांनी सोलापूर पोलिसांनी कारवाई करत घोडके बंधूना अटक करून कोट्यावधी रुपयांचा ड्रग्जसाठा व कच्चा माल,केमिकल चिंचोळी एमआयडीसी मधून जप्त केला होता.ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे थेट सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी पर्यंत आले व नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने चिंचोळी एमआयडीसीत येऊन कारवाई केली होती.ड्रग्ज रॅकेट मधील दहाव्या संशयित आरोपीने देखील सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी कारखाना दाखवला आहे.सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी ड्रग्जच्या बाजारात पुन्हा एकदा ड्रग्ज कारवाई प्रकरणात चर्चेत आली आहे.