• Wed. Apr 30th, 2025

लातूर जिल्ह्यात 4 लाख 6 हजार कुटुंबांना दिवाळीनिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

Byjantaadmin

Nov 4, 2023

लातूर जिल्ह्यात 4 लाख 6 हजार कुटुंबांना दिवाळीनिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत लातूरमधून वितरणास प्रारंभ

लातूर  (जिमाका) : जिल्ह्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आजपासून ‘आनंदाचा शिधा’ वितरण सुरु करण्यात आले. लातूर येथील दुकान नंबर 73 खडगाव रोड येथून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात पात्र लाभधारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला. जिल्ह्यात सुमारे 4 लाख 6 हजार कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जाणार आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, पुरवठा निरीक्षक अंबर, रेशन दुकानदार विभागीय संघटनेचे हंसराज जाधव व किशोर गायकवाड तसेच मोठ्या प्रमाणावर लाभधारक यावेळी उपस्थित होते.

दिवाळीच्या पूर्वी सर्व पात्र शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून दिला जाईल, असे नमूद करून जिल्हाधिकारी यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, मैदा व पोहा असे 6 शिधा जिन्नसांचा समावेश असलेला शिधा जिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच 100 रुपये या दराने वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात वितरण सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी दिली.

तालुकानिहाय कुटुंब संख्या

लातूर तालुका : 99 हजार 305,  उदगीर तालुका : 45 हजार 401, निलंगा तालुका : 54 हजार 025, औसा तालुका : 57 हजार 034, चाकूर तालुका : 30 हजार 440, रेणापूर तालुका : 28 हजार 740, देवणी तालुका : 19 हजार 042, शिरूर अनंतपाळ  तालुका :  16 हजार 840, जळकोट तालुका : 15 हजार 958, अहमदपूर तालुका : 39 हजार 240 असे जिल्ह्यात एकूण 4 लाख 6 हजार 35 पात्र कुटुंबांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed