अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय एका वर्षात सुमारे 80 प्रकरणे निकाली काढते, तर या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 72 हजार प्रकरणे निकाली काढली आहेत आणि लोकांची सेवा करण्याची आपली वचनबद्धता दर्शविली आहे, असे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाशी तुलना करताना त्यांनी ही माहिती दिली. एचटी लीडरशीप समिट 2023 शेवटच्या सत्रात CJI चंद्रचूड बोलत होते.
डी वाय चंद्रचूड यांनी यूएस आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची तुलना करताना न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबद्दल त्यांचा दृष्टिकोन सांगितला. अमेरिकन न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांसाठी निवृत्तीचे वय नाही. तर भारतात न्यायाधीश निवृत्त होतात. न्यायाधीश देखील मानूस आहे त्यामुळे ते देखील चुकू शकतात. त्यामुळे येणार्या पिढ्यांवर जबाबदारी सोपवणे महत्त्वाचे आहे.
यावेळी न्यायालयांमध्ये मागासवर्गीय आणि महिलांची संख्या कशी वाढेल? यावर देखील CJI चंद्रचूड यांनी भाष्य केले. संपूर्ण भारतात जिल्हास्तरीय न्यायालयांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक महिलांची नियुक्ती केली जात आहे. ही चांगली गोष्ट आहे.राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 120 पैकी 70 महिलांची नियुक्ती केली जाते.लॉ फर्ममध्ये महिलांची नियुक्ती झाली की, कुटुंबाची जबाबदारीही महिलांवर असते आणि मुलांचे संगोपन करावे लागते, अशी मानसिकता असते. हा विचार बदलल्याशिवाय सुधारणा शक्य नाही, असे देखील चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.