परदेशात गेलेल्या ५० ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो. पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही, यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. सरकारने या विद्यार्थ्यांना तातडीने पैसे पाठवून न्याय द्यावा, अशीही मागणी केली आहे.
“शिष्यवृत्तीचे पैसे न मिळाल्याने परदेशात गेलेले ५० ओबीसी विद्यार्थी संकटात सापडले आहेत. सरकारच्या भरोशावर परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी आपला निवास खर्च भागवायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे. सरकार आमदारांना, कंपन्यांना खुश करण्यात मग्न आहे. त्यांना विद्यार्थ्यांची काळजी नाही. विद्यार्थ्यांना ताडबतोब पैसे पाठवून त्यांना न्याय द्यावा”, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
“परदेशात गेलेले विद्यार्थ्यांवर फी भरली नाहीतर वर्गात बसू दिले जाणार नाही, अशी परिस्थिती आहे. स्वत: जवळचे पैसे संपल्याने विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संचालक कार्यालयातून प्रस्ताव प्राप्त झाल्यावर पैसे वितरित करण्यात येतील, असे सांगून मंत्रालयातील अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. सरकारचा प्रशासनावर वचक राहिला नाही”, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.पुढे वडेट्टीवार म्हणाले की, मंत्रिमंडळात ओबीसी नेते आहेत. मात्र, तरीही विद्यार्थ्यांवर अशी वेळ का येते? ओबीसी नेत्यांनी बघ्याच्या भूमिकेत राहू नये. त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी उपाशी असताना निर्ढावलेली यंत्रणा मात्र तुपाशी, अशी टीका वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.