मुंबई:-विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टी झालेली असताना सरकारकडून शेतकऱ्यांना मदत होतच नाही. 70 ते 90 रुपये पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतोय. सरकारने बळीराजाला कोर्टात जाण्याची आणि जलसमाधी घेण्याची वेळ येऊ देऊ नये. त्यासाठी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करायला हवी, पण हे सरकार चर्चा करायला तयार नाही, असा आरोप अजित पवारांनी केला आहे.
वीज कापली जातेय
अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना पाणी लागत असताना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापली जात आहे, हे थांबविले पाहिजे असे अजित पवारांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की निर्णय झाला आहे, मात्र अजूनही वीज कनेक्शन तोडणी सुरू आहे. अंमलबजावणी अधिकारी वर्गाकडून ग्रामीण भागात होताना दिसून येत नाही. अधिकारी आठमुठेपणा करत असल्याचा आरोपही अजित पवारांनी केला आहे. या प्रकरणी आदेश काढणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे पवारांनी म्हटले आहे. शेतकरी संकटात असताना वीज कनेक्शन कट करण्याचा धंदा राज्य सरकारकडून सुरू आहे.
कोर्टात जाण्याची वेळ नको
शेतकऱ्यांनी दीड ते 3 हजार रुपये भरून पीकविमा काढले आहेत. मात्र, त्यांच्या खात्यात 70 ते 90 रुपये जमा होत आहे. राज्य सरकारकडून त्यांना कसलीच मदत झाली नाही. सरकारने बळीराजाला कोर्टात जाण्याची आणि जलसमाधी घेण्याची वेळ येऊ देऊ नये. त्यासाठी शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करायला हवी, चर्चेतून सर्व प्रश्न सुटतात, मात्र हे सरकार चर्चा करायलाच तयार नाही, असा आरोप अजित पवारांनी केला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीने प्रयत्न करायला हवे असेही अजित पवारांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नसल्याने त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचेही यावेळी अजित पवारांनी म्हटले आहे.