तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. ११९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी भारत राष्ट्र समिती ( पूर्वीची तेलंगणा राष्ट्र समिती ) आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची धाकटी बहीण वायएसआर तेलंगणाच्या प्रमुख वायएस शर्मिलाही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. पण, वायएस शर्मिला यांनी आता मोठा निर्णय जाहीर केला आहे.
तेलंगणा विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय वायएस शर्मिला यांनी घेतला आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं शर्मिला यांनी सांगितलं.शर्मिला यांनी म्हटलं की, “वायएसआर पक्षानं महत्वाचं निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत केसीआर यांचा पराभव करायचा असेल, तर मतांचं विभाजन टाळायला हवं. त्यामुळे ही निवडणूक आम्ही लढणार नाही आहोत. त्याऐवजी काँग्रेसला पाठिंबा देणार आहे.”“केसीआर यांच्या नेतृत्वाखाली बीआरएसच्या भ्रष्ट राजवटीचा अंत करण्यासाठी त्यांच्या पक्षानं बलिदान देण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शर्मिला यांनी सांगितलं.“अनेक सर्वेक्षणातून समोर आलं की आम्ही विधानसभा निवडणूक लढल्यानं काँग्रेसच्या मतांवर परिणाम होत आहे. राज्याच्या आणि नागरिकांच्या हितासाठी तेलंगणा विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शर्मिला यांनी म्हटलं.वायएस शर्मिला यांनी सप्टेंबर महिन्यात congress नेत्या सोनिया गांधी आणि खासदार rahul gandhi यांची भेट घेतली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं शर्मिला यांनी सांगितलं होतं.