मुंबई – दिवाळीत हिल स्टेशन माथेरानला फिरण्याचा बेत आखत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेनबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. माथेरान मिनीट्रेनची सेवा ४ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. नेरळ – माथेरान – नेरळ अशी ही मिनीट्रेनची सेवा असणार आहे. मध्य रेल्वेप्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. अमन लॉज ते माथेरान अशी सेवा सुरु आहे. पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज ही सेवा बंद करण्यात आली. पण ही सेवा आता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर आहे. येथे अनेक पर्यटक दिवाळीच्या सुट्ट्यात भेट देत असतात. मुंबईकरांच्या फिरण्यासाठी अत्यंत योग्य असे हे जवळचे डेस्टिनेशन असते. मात्र येथे जाण्यासाठी माथेरानच्या मिनी ट्रेनची सेवा पावसाळ्यात अर्धवट सुरु असते. पण आता नेरळ ते माथेरान अशी ही सेवा पुन्हा एकदा सुरळीत होणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे.
मिनी ट्रेनचं वेळापत्रक –
५२१०३ नेरळवरुन ८.५० ला सुटेल आणि माथेरानला ११.३० वाजता पोहोचेल.
५२१०५ ही दुसरी गाडी असेल. ती नेरळवरुन १०.२५ वाजता सुटेल आणि ०१.०५ वाजता माथेरानला पोहचेल. या दोन्ही गाड्यांची सेवा ही दररोज असणार आहे.
माथेरानवरुन ५२१०४ ही गाडी ०२.४५ मिनिटांनी सुटेल आणि ती नेरळला ५.३० मिनिटांनी पोहचेल.
५२१०६ ही दुसरी गाडी ०४.०० वाजता माथेरानवरुन सुटेल आणि ६.४० ला नेरळला पोहचेल. या गाड्यांची सेवा देखील दररोज असणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जून ते ऑगस्ट दरम्यान एक लाख १३ हजार ८८७ प्रवाशांनी या मिनी ट्रेनमधून प्रवास केला आहे.