वर्धा – आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काही महिन्यांचा अवधी शिल्लक असला तरी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने खूप आधीच निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली असून मतदार संघनिहाय आढावाही घेतला गेला आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी भाजपने ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्यांचे उदिष्ट ठेवले आहे. त्यासाठी आता भाजपकडून महाविजय २०२४ संकल्प यात्रेला (Sankalp Abhiyan yatra) सुरूवात झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपकडून राज्यभरात महाविजय २०२४ संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र यावेळी त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र आहे.
भाजपकडून आज वर्ध्यात ‘संकल्प ते समर्थन’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील साई मंदिर ते अंबिका चौकापर्यंतच्या पदयात्रेत २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान कोण पाहिजेत असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी महिलांना केला. या प्रश्नावर वर्ध्यातील एका महिनेचा राग अनावर झाला. महिला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संतापल्या. महिला विरोधात बोलू लागताच बावनकुळेनी माईक खाली सरकावला. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
बावनकुळे पुढे गेल्यानंतर संतप्त झालेल्या महिलेला तेथील एकाने विचारले काय झालं व तुम्हाला काय पाहिजे. यावर सरकार विजेचे बिल वाढवून देतं, सिलिंडर वाढवून देतं, आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का? असा संतप्त सवाल महिलेने केला. महिलेचा संतप्त अवतार पाहून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेथून काढता पाय घेतला व तरीही महिला शांत होत नसल्याचे पाहून तुम्ही स्टेजवर चला, आपण स्टेजवर बोलू अशी विनंती केली. यावर संतापलेल्या महिलेने स्टेजवर बोलायचे तर मग लोकांना रस्त्यावर विचारता कशाला? असा प्रतिप्रश्न केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.