दिवाळी व एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन हे गेल्या काही वर्षापासून जणू समीकरण बनले होते. मात्र यंदा कोणतेही आंदोलन न करता सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३८७ कोटींची मदत दिली आहे. या आर्थिक मदतीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत कर्मचाऱ्यांनी वेतन मिळणार आहे.
यापूर्वी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजाराचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच सण अग्रिम म्हणून साडे बारा हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यातच आता राज्य सरकारने एसटी महामंडळाला ३८७ कोटींची मदत केल्यानं एसटी कर्मचाऱ्यांचा दिवाळीपूर्वी वेतन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाणार आहे.दरम्यान, कोरोना काळापासून तोट्यात असलेली एसटी आता पुन्हा एकदा गती पकडू लागली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांसाठी अर्ध्या तिकीट योजनेचा चांगला फायदा होत असून महामंडळाचे उत्पन्नही वाढले आहे. दरम्यान गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला बसला असून एसटीचे ८० कोटींचे नुकसान झाले आहे.