मराठा आरक्षणासाठी श्री कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी रस्त्यावर
निलंगा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी निलंगा शहरात डॉ. गजेंद्र तरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी हातात मेनबत्ती घेऊन कँडल मार्च काढला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी म्हणून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यात गावोगावी आमरण उपोषण, साखळी उपोषण, रास्तारोको आंदोलने करण्यात येत आहेत. निलंगा शहरात तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. मंगळवारी सायंकाळी श्री कोचिंग क्लासेसचे संचालक डॉ. गजेंद्र तरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास दोन हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरून हातात कँडल घेऊन शांततेच्या मार्गाने घोषणा देत शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मार्च काढला. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा करून आंदोलकांना पाठिंबा दिला.