अतिक्रमणामुळे पालिकेकडून रस्त्याच्या मधोमध नालीचे बांधकाम,नागरिकांचे जीव धोक्यात
निलंगा/प्रतिनिधीशहरातील ब्राह्मण गल्ली भागात असणाऱ्या समाज मंदिराकडे (उत्तरादी मठ) जाणाऱ्या रस्त्यावर राजकीय वरदहस्त असणाऱ्या पुरुषोत्तम तुबाजी यांनी रस्त्यावर बांधलेल्या कट्ट्यामुळे निलंगा नगरपालिकेने रस्त्याच्या मधोमध नालीचे बांधकाम केले आहे.त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की निलंगा शहरात ब्राह्मण गल्ली भागामध्ये शासनाच्या वतीने तत्कालीन पालकमंत्री नामदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून समाज मंदिर बांधण्यात आले आहे. समाज मंदिराकडे(उत्तरादी मठाकडे) जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर पुरुषोत्तम तुबाजी यांचे घर असून त्यांनी रस्त्याच्या सुरुवातीलाच कट्टा बांधलेला असल्याने आमदार साहेबांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या समाज मंदिराकडे जाणारा रस्त्यावरील हा अतिक्रमित कट्टा काढण्यापेक्षा निलंगा नगरपालिकेने तो कट्टा व त्या बाजूची जागा शिल्लक ठेवून रस्त्याच्या मधोमध नालीचे बांधकाम केले आहे. यामुळे त्या परिसरातील जाणाऱ्या नागरिकांना व समाज मंदिराकडे ये जा करणाऱ्या भक्तासाठी या रस्त्याने जाणे येणे कठीण झाले आहे. मठाकडे सामान असलेले वाहन घेऊन जाणे तर अशक्यच झाले आहे. एका व्यक्तीच्या अतिक्रमणामुळे संपूर्ण गल्ली व भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे त्याच रस्त्यावरील इतरांचे कट्टे रस्ता मोठा करण्यासाठी नगर परिषद कडून काढण्यात आला आहे. यासाठी संजय वामनराव इनामदार, राम रमेशराव तुबाजी, बंडू मुकुंदाचार्य अपसिंगेकर, वेणुगोपाल पुरुषोत्तमाचार्य काशीकर,वैभव पाटिल,डॉक्टर हरीपंत धोंडदेव,घनश्याम देशपांडे, गिरीश वामनराव पिंपळे आदींनी निलंगा नगरपालिका व उपविभागीय जिल्हाधिकारी लातूर यांना लेखी निवेदन देऊन अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली आहे तरीही पालिकेकडून अतिक्रमण हटवण्यापेक्षा रस्त्याच्या मधोमध नाली बांधकाम केल्यामुळे तेथील जनतेला व भावी भक्तांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रस्त्यातवर करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ काढून रस्त्याच्या कडेने नालीचे बांधकाम करून द्यावे अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याच्या भुमिकेत भक्तगण आले आहेत.