• Wed. Apr 30th, 2025

लोकाभिमुख व गतिमान प्रशासनावर मनपाचा भर  पालिका आयुक्तांची माहिती

Byjantaadmin

Oct 31, 2023

लोकाभिमुख व गतिमान प्रशासनावर मनपाचा भर  पालिका आयुक्तांची माहिती

अतिक्रमण हटविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करणार

लातूर/प्रतिनिधी: महानगरपालिकेचे प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख व गतिमान असावे असा आपला प्रयत्न आहे.शहरातील नागरिकांना दर्जेदार सेवा- सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध आहे.शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली. पालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त मनोहरे बोलत होते.यावेळी अतिरीक्त आयुक्त शिवाजी गवळी,उपायुक्त मयुरा शिंदेकर, सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे, मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलघणे,सहाय्यक संचालक नगररचना निकिता भांगे आदींसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 आयुक्तांनी यावेळी आपल्या वर्षभराच्या कामकाजाचा आढावा सादर केला.यावेळी माहिती देताना आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले की,शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.आगामी एक ते दीड महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यानंतर पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली जाणार आहे. अतिक्रमण काढल्यानंतर त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.अनधिकृत बांधकामाबाबतही लवकरच मोहीम हाती घेण्यात येणार आहे. बांधकामात अनियमितता आढळली तर संबंधित नागरिक तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. लातूर शहराला सप्टेंबर २०२४ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या मांजरा प्रकल्पात आहे.तरीही नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा,असे आवाहन आयुक्तांनी केले  व्यावसायिक व सार्वजनिक वापराच्या इमारतींना आग लागून दुर्घटना होऊ शकते.त्यासाठी अशा इमारतींना अग्नीरोधक यंत्रणा बंधनकारक आहे. पालिकेकडून दरवर्षी अशा इमारतींचे फायर ऑडिट केले जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.

  आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी मनपा २५ मीटरचे रेस्क्यू लॅंडर खरेदी करणार असल्याचेही ते म्हणाले. अनेकदा घरगुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक ठिकाणी वापरले जाते. त्यामुळे धोका होऊ शकतो.या संदर्भात मा.जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील धोरण ठरविण्यात येईल. कचरा व्यवस्थापन आणि शहराच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे.शहर अधिक सुंदर करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. स्वच्छतेसाठी नुकतीच जटायू मशीनची खरेदी करण्यात आली असून आता स्वच्छता गतिमान होणार आहे.प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मनपाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.मनपा मुख्यालयसह मनपाच्या सर्व इमारतींचे जल पुनर्भरण करण्यात आले आहे.नागरिकांनीही पुनर्भरण करावे यासाठी जनजागृती केली जात आहे.पालिकेच्या वतीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून यामुळे आर्थिक बचत होत आहे.कचरा आणि टाकाऊ वस्तु पासून बायोगॅस निर्मितीचे प्रकल्प मनपाने उभारले असून त्यापैकी काही कार्यान्वित झाले आहेत.पालिकेच्या कामाचा व्याप मोठा असून कर्मचारी अपुरे आहेत.शासनाने कांही पदे भरण्यास मंजुरी दिली असून त्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले.

भुयारी गटार योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो मंजुरीच्या टप्प्यात आहे. मनपाच्या चारही झोनमध्ये प्रत्येकी दोन वाचन कट्ट्यांची निर्मिती केली असून स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रही सुरू केले आहेत.ग्रंथालय इमारतीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.नागरिकांच्या आरोग्यासाठी आपला दवाखाना हा उपक्रम चालू करण्यात आला असून शहरातील वनराईचे प्रमाण वाढविण्यासाठी वन बर्थ वन ट्रीहा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेने मोफत मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरही आयोजित केले होते. गरोदर मातांसाठी जननी रथ योजना पालिका राबवत आहे.आधार नसलेल्या व्यक्तींसाठी नागरी बेघर निवारा उभारण्याचे काम सुरू आहे.बचत गटांच्या माध्यमातून पालिकेने महिलांचे संघटन केले असून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे.शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4808 घरकुले मंजूर असून त्यापैकी 2721 घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत.रमाई आवास अंतर्गत चालू वर्षात 1013 घरकुले मंजूर केली आहेत.ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र सुरू करण्यात आली असून महिलांसाठी शहर बस सेवा मोफत उपलब्ध आहे. आणखी 50 बसेसचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असल्याचे आयुक्त म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed