लातूर : मराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील व्यंकट ढोपरे यांनी आळंदी येथे इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता लातूर तालुक्यातील गोंद्री या गावी मराठा आरक्षणासाठी दुसरी आत्महत्या झाली आहे. येथील मराठा शेतकरी शरद भोसले यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे.
शरद भोसले यांचा मृतदेह शवविच्छेदणासाठी हसेगावं येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शरद भोसले यांच्या पश्चात पत्नी कोमलबाई, तर अश्विनी आणि राणी या दोन मुली आणि आई, वडील, दोन भाऊ, दोन भावजया, पुतणे असा परिवार आहे. या घटनेने गोंद्री गावावर शोककळा पसरली आहे.
गोंद्री गावात प्रशासन दाखल झालं आहे. पण, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आल्याशिवाय आणि लेखी आश्वासन दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेतलं जाणार नाही, असा पवित्रा नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सध्या वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून लातूर ग्रामीण, औसा, किल्लारी येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बंदोबस्तासाठी बोलावण्यात आलं आहे.
मराठा आरक्षणासाठी अनेकजण प्राणाची आहूती देत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी कोणीही आत्महत्या करू नये, असं आवाहन केल्यानंतरही लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. मराठा आरक्षणासाठी ”करेंगे या मरेंगे”, अशी भूमिका मराठा समाज घेताना यातून दिसून येत आहे. त्यामुळे आंदोलनाची वाढती धग पाहता सरकार यावर कधी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे