‘मेरी माटी मेरा देश‘ अंतर्गत अमृत कलशांच्या मिरवणुका पारंपरिक वाद्यांचा झाला गजर
लातूर/प्रतिनिधी:‘मेरी माटी मेरा देश‘ उपक्रमांतर्गत शहराच्या विविध भागातून अमृत कलशात माती संकलित करण्यात आली.शहरातील चारही झोन मधून या अमृतकलशांच्या मिरवणुका काढत हे कलश गुरुवारी (दि.१२) महानगरपालिकेत आणण्यात आले भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मागील महिनाभरापासून शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘मेरी माटी मेरा देश‘ हा उपक्रमाअंतर्गत शहराच्या विविध भागात घरोघर जाऊन माती संकलित करण्यात आली.शहरातील ए,बी,सी व डी या चारही झोन कार्यालयात स्वतंत्रपणे हे अमृत कलश ठेवण्यात आले होते.
गुरुवारी सकाळी मिरवणुकीद्वारे हे अमृतकलश महानगरपालिकेत आणण्यात आले.चारही क्षेत्रीय कार्यालयांचे अधिकारी,कर्मचारी तसेच त्या-त्या भागातील नागरिकांनी या मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला.पारंपारिक वाद्यांच्या गजरात विविध वेशभूषा केलेले कलाकारही या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते.या अमृत कलश यात्रा मनपाच्या मुख्य कार्यालयात पोहोचल्यानंतर आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त शिवाजी गवळी, उपायुक्त मयुरा शिंदेकर,सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे,मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगणे, मुख्यलेखापरिक्षक कांचन तावडे, नगर सचिव अश्विनी देवडे यांनी या यात्रांचे स्वागत केले. चारही झोन मधून आलेल्या अमृत कलशातील माती एकत्रित करून लातूर महानगरपालिकेचा अमृत कलश दि.२७ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाठविला जाणार आहे.तेथून हा कलश व लातूरची माती दिल्लीत पोहोचणार आहे. यासाठी मनपाच्या वतीने कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. दिल्ली येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास हे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.