मुंबई : टोलबंदीच्या मागणीसाठी पुन्हा राजकीय आंदोलनांना धार चढली असली, तरी मुंबईच्या वेशीवरील आगमन-निर्गमनासाठीची टोलवसुली सन २०२७पर्यंत सुरूच राहील. मात्र त्यानंतर तरी प्रवाशांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या हाती आहे. सन २०२७पासून टोलवसुली करण्याचे अधिकार मिळावेत, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) राज्य सरकारला २३ जूनला प्रस्ताव पाठविला. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यास ही टोलवसुली सुरू राहू शकेल. कदाचित आताचे मंत्रिमंडळही सन २०२७नंतरच्या टोलवसुलीचा प्रस्ताव फेटाळू शकते, मात्र तसे होईल का, हा प्रश्न आहे.
मुंबईच्या वेशीवरील पाच टोलनाके मुंबईत येणाऱ्या व बाहेर पडणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. १ ऑक्टोबरपासून या टोलदरात सरासरी १५ टक्के वाढ झाली. दुचाकी वगळल्यास सर्वांनाच त्याचा भुर्दंड बसत आहे. टोलचा हा बोजा ३० सप्टेंबर २०२७पर्यंत कायम असेल. ‘मुंबईतील १ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांसाठी पुढे हा टोल आम्हाला वसूल करू द्या’, अशी मागणी एमएमआरडीएने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील अर्थसंकल्पीय बैठकीत १० मार्च २०२३ रोजी मंजूर केली. मात्र ती मंजुरी केवळ प्राधिकरणाची होती. सरकारची अद्याप त्या निर्णयाला मंजुरी नाही. त्यामुळे ही टोलवसुली सुरू ठेवावी की नाही, हा चेंडू आता राज्य सरकारच्याच कोर्टात आहे.’२०२७ नंतर टोलवसुलीचे अधिकार एमएमआरडीएकडे सोपविण्याच्या प्रस्तावास बैठकीत मंजुरी देण्यात आली असली, तरीही या अनुषंगाने त्यासंबंधीचा प्रस्ताव २३ जून २०२३ रोजी सरकारकडे सादर करण्यात आला. सद्यस्थितीत या प्रस्तावावर सरकारकडून कार्यवाही सुरू आहे,’ असे एमएमआरडीएने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. यानुसार अद्याप सरकारने हा प्रस्ताव मंजूर केलेला नसून मुंबईकरांच्या हितार्थ प्रस्ताव नाकारण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. त्यांना ते करणे शक्य आहे, असे स्पष्ट होत आहे. ‘मेट्रो, मोनोरेल, रस्ते, उड्डाणपूल, बोगदे, पाणीपुरवठा प्रकल्प आदी विकासकामांसाठी निधीची उपलब्धता प्राधिकरणाच्या स्वत:च्या निधीमधून करण्यात येत आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुल, वडाळा ट्रक टर्मिनस आणि ओशिवरा येथील भूखंडविक्री करून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा प्रामुख्याने समावेश आहे. तथापि, हे भूखंड संपुष्टात येत असल्याने निधीवर परिणाम होत आहे. या अनुषंगाने निधी उपलब्धतेचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठीच असा विनंती प्रस्ताव एमएमआरडीएने सरकारकडे पाठविला आहे’, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.
पूर्व मुक्त मार्ग विस्तारावर स्वतंत्र टोल
सध्या पूर्व मुक्त मार्ग हा दक्षिण मुंबईतून घाटकोपर येथे संपतो. त्यापुढे ठाणे, आनंदनगरपर्यंत १३ किमीच्या उन्नत विस्तारासाठी २,८९३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. या विस्तारित उन्नत मार्गावर (उड्डाणपूल) सध्याच्या टोलनाक्याच्या डोक्यावर मुलुंड येथे नाशिक व ठाण्याहून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र टोलनाका उभारण्याचेही एमएमआरडीएचे नियोजन आहे.
सध्या पूर्व मुक्त मार्ग हा दक्षिण मुंबईतून घाटकोपर येथे संपतो. त्यापुढे ठाणे, आनंदनगरपर्यंत १३ किमीच्या उन्नत विस्तारासाठी २,८९३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. या विस्तारित उन्नत मार्गावर (उड्डाणपूल) सध्याच्या टोलनाक्याच्या डोक्यावर मुलुंड येथे नाशिक व ठाण्याहून येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र टोलनाका उभारण्याचेही एमएमआरडीएचे नियोजन आहे.