• Wed. May 7th, 2025

…तर एकनाथ शिंदे आज जिवंत नसते

Byjantaadmin

Oct 11, 2023

EKNATH SHINDE हे जर उद्धव ठाकरेंना बाहेर पडले नसते तर त्यांना ठार मारलं असतं, त्यांना जीवे मारण्याचा कट होता असा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झेड प्लस सुरक्षा का नाकारली असा सवालही त्यांनी केला. संजय गायकवाड यानी केलेल्या आरोपांनंतर आता पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाल्याचं चित्र आहे.

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? 

उद्धव ठाकरे यांचे हात खेचले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जिवंत नसते, असा खळबळजनक आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. संजय गायकवाड म्हणाले की, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले उद्धवसाहेब देत होते, शिंदेंनी त्यांचे हातच घेतले. त्याला मी उत्तर दिलं की जर आम्ही उद्धव ठाकरे यांचे हात घेतले नसते, तर आज कदाचित एकनाथ शिंदे आज जिवंत दिसले नसते. GADCHIROLIला एकनाथ शिंदे जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कडक भूमिका घेतली होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी दिली होती.

उद्धव ठाकरेंचा फोन आला

संजय गायकडवाड पुढे म्हणाले की, शिंदेंच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून, राज्य सरकारने शंभूराज देसाई तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या घरी बैठक बोलावली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा प्रयत्न झाला. तितक्यात उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन शंभूराज देसाईंना फोन करुन शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका असं सांगितलं. त्याचा अर्थ काय होतो? की एकनाथ शिंदेंना मरण्याकरिता नक्षलवाद्यांच्या तोंडी द्यायचं. एकप्रकारे त्यांना पक्षातून आणि जीवनातून संपवण्याचा कट होता. त्यामुळे राऊत म्हणाले की देता देता आमचे हात घेतले, तर आम्ही त्यांचे हात घेतले नसते तर तुम्ही आमच्या एकनाथ शिंदेंचा बळी घेतला नसता.

उद्धव ठाकरेंचा फोन आला होता, शंभूराज देसाई म्हणाले….

संजय गायकवाडांनी यांनी आरोप केल्यानंतर शंभूराज देसाई यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एकदा नव्हे तर दोन वेळा शिंदेना धमकीची पत्रं आली होती. ती पत्रं आपण पोलिसांकडे त्यावेळी दिली. शिंदेंच्या परिवाराचाही त्यामध्ये उल्लेख होता. विधानसभेमध्येही यावर चर्चा झाली. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्देश दिले होते. त्यावर झालेल्या बैठकीनंतर शिंदेंना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे यावर एकमत झालं. तसा प्रस्ताव उद्धव ठाकरेंच्याकडे पाठवण्यात आला. त्या बैठकीच्या दिवशी उद्धव ठाकरेंचा फोन आला. बैठकीबद्दल माहिती घेतली. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं की अशा प्रकारे शिंदेना सुरक्षा देता येणार नाही.

या प्रश्नी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या आरोपात काही तथ्य नाही. उद्धव ठाकरेंवर काहीही आरोप करायचे म्हणून केले जात आहेत. संजय गायकवाड आता काहीही बोलत आहेत. आता त्यांची वेळ संपली असल्याने काहीही आरोप करून निघून जायचे असं सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *