गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही, याबाबत अनेक संभ्रम असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आमदारांना हुलकावणी देत असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराऐवजी आता या आमदारांना विधिमंडळाच्या विविध समित्यांवर समाधान मानावे लागणार आहे.सत्तेत सहभागी झालेल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना विधिमंडळाच्या विविध 28 समित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. समित्या वाटपाचे सूत्र ठरवण्यात आले असून, भाजपला 14 समित्या तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी सात समित्या देण्यात येणार आहे.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्षांच्या समन्वय समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हे सूत्र ठरले. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, शिवसेनेचे मंत्री BHUSE आणि खासदार राहुल शेवाळे, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार या बैठकीस उपस्थित होते.विशेषाधिकार समिती, आश्वासन समिती पंचायत राज समिती, रोजगार हमी योजना समिती अशा विविध 28 समित्या विधिमंडळात कार्यरत असतात. काल झालेल्या बैठकीतील धोरणानुसार या समित्यांमध्ये सदस्य म्हणून घेण्यात येणाऱ्या आमदारांची आणि अध्यक्षांची नावे लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच अजित पवार यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येतील. त्यांच्या मंजुरीनंतर या नावांची घोषणा करण्यात येणार आहे.
BJP पुन्हा एक पाऊल मागे
समित्यांचे आणि महामंडळाचे वाटप 60:20:20 असे करावे, असा भाजपचा आग्रह होता. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने 50:25:25 असे वाटप व्हावे, असा आग्रह धरल्यानं त्याप्रमाणे हे वाटप निश्चित करण्यात आले.