डोक खाली पाय वर करत वृक्ष तोडीचा निषेध ग्रीन लातूर वृक्ष टीम.
लातूर जिल्ह्याचे वनक्षेत्र महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी आहे. सदैव दुष्काळी परिस्थिती आणि यावर्षी अत्यल्प पावसामुळे पिण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होणार आहे. जिल्ह्यामध्ये जोपर्यंत कालबद्ध कार्यक्रम घेऊन झाडांची नियोजनबद्ध पद्धतीने वृक्ष लागवड वृक्ष जोपासना करुन झाडांची संख्या वाढणार नाही तोपर्यंत लातूर जिल्ह्यावर सदैव असणारे दुष्काळी परिस्थितीच सावट नष्ट होणार नाही.
एक टक्क्यांपेक्षाही कमी वनक्षेत्र असतानाही लातूर जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे विनापरवानगी, अनावश्यक पद्धतीने वृक्षतोड होत आहे असं दिसून येत असते. आणि या वृक्षतोडीवर कुणाचेही कुठल्याही पद्धतीने नियंत्रण नाही असेही लक्षात आलेले आहे.
मागील सात-आठ महिन्यापासून वृक्षतोडीवर कुठेही कारवाई झालेली ऐकण्यात आलेली नाही.
गणपतीच्या मंडपाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक, औसा रस्ता, छत्रपती शाहू महाराज चौक, दयानंद गेट परिसरात इत्यादी ठिकाणी मोठमोठी झाडे, कष्टाने वाढवलेली झाड ट्री गार्ड सहित तोडून आणि उपटून काढण्यात आली. महानगरपालिका प्रशासनाला याची पूर्व सूचना देऊनही त्यांनी यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. या उपरांत गंभीर परिस्थिती म्हणजे गणपतीच्या मिरवणुकीच्या निमित्ताने औसा रस्त्यावरती गणपतीची मिरवणूक पाठीमागे आणि महानगरपालिका ची यंत्रणा झाडांची छटाई करत पुढे पुढे असं विचित्र विसंगत चित्र दिसून आलं. कोणतीही जयंती, उत्सव आल्या मिरवणुका निघाल्या की पहिल्यांदा महानगरपालिका झाडांची छाटणी किंवा झाडांची कटाई चालू करते.
मागील दोन, तीन, चार वर्षांमध्ये महानगरपालिकेने लातूर शहरांमध्ये कुठेही स्वतः पुढाकार घेऊन वृक्ष लागवड किंवा वृक्ष संगोपनाचे कार्यक्रम घेतलाय किंवा कोणता उपक्रम घेतला आहे असं आढळून आलेले नाही.
मागील पाच-सहा वर्षांपासून लातूर जिल्ह्यामध्ये आक्रमक पद्धतीने वृक्ष लागवड वृक्ष संगोपन करणाऱ्या ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांना आज औसा रस्ता परिसरात गणपती मंडपच्या निमित्ताने पूर्णपणे वाढलेले एक झाड बुडातून तोडून टाकण्यात आलेलं निदर्शनास आलं.याची दखल घेऊन ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी खाली डोकं वर पाय असं आंदोलन करून या वृक्षतोडीचा निषेध केलेला आहे. महानगरपालिका उद्यान विभाग, वृक्ष विभागाने या प्रकारची दखल घ्यावी, शहरांमध्ये आहे ती झाड टिकून ठेवावी , वृक्षतोडी पूर्णपणे आळा घालावा असे विनंती ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने करण्यात आली आहे.