नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जाणाऱ्ऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी १२ वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यावेळी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. या विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान आणि निकालाची तारीख याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण आहे. या पाच राज्यांमधील निवडणुका सत्ताधारी भाजप आणि विरोधातील इंडिया आघाडी यांच्यातील पहिली थेट लढाई ठरेल. त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा आहेत. तर राजस्थानात २००, तेलंगणात ११९, छत्तीसगढमध्ये ९० आणि मिझोराममध्ये विधानसभेच्या ४० मतदारसंघात निवडणूक पार पडेल. सध्या मध्य प्रदेशात भाजप, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेस, तेलंगणात भारत राष्ट्र समिती आणि मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट हे पक्ष सत्तेत आहेत. यापैकी राजस्थान आणि मध्य प्रदेशातील निवडणूक अत्यंत रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपला यश मिळणार का, हे पाहावे लागेल. तर मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा काँटे की टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये भाजप सामर्थ्यशाली नेत्या वसुंधरा राजे यांना बाजूला सारुन थेट मोदी-शाह यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवण्याची रणनीती आखत आहे. तर मध्य प्रदेशातही भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी भाजपचा नवा चेहरा आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. भाजपकडून मध्य प्रदेशात तीन उमेदवारी याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यापैक एकामध्येही मुख्यमंत्री असलेल्या शिवराजसिंह चौहान यांचे नाव नाही. तसेच आगामी मुख्यमंत्री कोण असेल, हेदेखील भाजपने जाहीर केलेले नाही. उलट मध्य प्रदेशात भाजपने पाच केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यापैकी एकजण मध्य प्रदेशातील पुढचा मुख्यमंत्री ठरू शकतो. तसे झाल्यास तीन टर्म मुख्यमंत्रीपद भुषविलेल्या शिवराजसिंह चौहान यांचे भाजप पक्षसंघटनेतील महत्त्व कमी होऊ शकते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या निवडणुकीत शिवराजसिंह चौहान काय भूमिका घेतात, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
लोकसभेच्या लिटमस टेस्टचा मुहूर्त ठरणार, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा

या पाचही राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा मोदी फॅक्टर अजूनही कितपत प्रभावी आहे, याची चाचपणी होईल. याशिवाय, जातीनिहाय जनगणना, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि अँटी-इन्कम्बन्सी हे घटकही पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे भवितव्य ठरवतील. सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मनसुबा असलेल्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक एकप्रकारे अग्निपरीक्षा ठरणार आहे.